नागपूर : मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारात मूळ शुल्क आणि मिळकत दडवून कोट्यवधी रुपयांचा कर चुकवल्या प्रकरणात प्राप्तिकर विभागाने (आयटी) सोमवारी खामला येथील उपनिबंधक कार्यालयात पडताळणी करत कागदपत्रांची झडती घेतली. विभागाच्या सर्वेक्षण पथकाने या उपनिबंधक कार्यालयांमधून झालेल्या ३० लाख रुपये पेक्षा अधिक किमतीच्या अनेक मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारात आकारलेल्या नोंदणी शुल्काची तपासणी सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत पथक कागदत्रांची झडती घेत हिशेब लावत होते.

प्राप्तिकर विभागाच्या गुप्तचर आणि गुन्हे अन्वेषण शाखेने (आय अँड सी.आय.) सायंकाळी सहाच्या सुमारास कार्यालय बंद होत असतानाच ही कारवाई सुरू केली. ३० लाखांपेक्षा अधिक किंमत असलेल्या मालमत्तांची खरेदी- विक्री करताना प्राप्तिकर विभागाला माहिती कळवणे आवश्यक असते. मात्र ती न दिल्याने तपासणीसाठी धडकलेल्या पथकाने अशा मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारात प्रत्यक्षात किती नोंदणी शुल्क आकारले याच्या व्यवहारावर लक्ष केंद्रित केले आहे. प्राप्तिकर विभागाच्या सर्वेक्षण पथकांनी काही दिवसांपूर्वी सिव्हिल लाईन्स आणि रेशीमबाग तर हिंगणा, सदर, म्हाळगीनगर आणि महाल येथील उपनिबंधक कार्यालयांवर छापे टाकले होते. यात हजारो कोटी रुपयांचे व्यवहार कमी नोंदवले गेले होते. यात पथकाने केवळ हिंगणा उपनिबंधक कार्यालयातच ८०० कोटींपेक्षा जास्त करचोरी उघडकीस आणली होती.

त्यानंतर सोमवारी झालेली ही आणखी एक मोठी कारवाई मानली जात आहे. याच संशयावरून प्राप्तिकर विभागाचे पथक सायंकाळी खामला उपनिबंधक कार्यालयात धडकले. अधिकाऱ्यांनी मालमत्ता नोंदणीची कागदपत्रे ताब्यात घेत बारकाईने तपासणी सुरू केली. यात मोठ्या प्रमाणात विसंगती आढळली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

मद्य व्यावसायिकावर उत्पादन शुल्क विभागाचा छापा

नागपूर : महाराष्ट्राच्या तुलनेत शेजारील राज्य मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे मद्याचे शुल्क कमी आहे. त्यामुळे तेथील स्वस्तातल्या मद्याचा साठा उपराजधानीत होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी रामदासपेठ येथील एका मद्य व्यावसायिकावर छापा टाकला व परराज्यातील मद्याचा साठा जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कर चोरी करत मध्य प्रदेशातून आणलेली दारू महाराष्ट्रातील दरानुसार विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या मद्य व्यावसायिकावर कारवाई सुरू आहे. यात आणखी काही मद्य व्यावसायिक सहभागी असल्याचाही पथकाला संशय आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी मद्य व्यावसायिकाच्या नावासंदर्भात गुप्तता पाळली आहे. मात्र, अशी कारवाई झाली असल्याचा माहितीवर त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दुजोरा दिला.