बुलढाणा : काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी श्री संप्रदायाचे जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांचे बुलढाण्यातील शिष्य आणि अनुयायी आक्रमक झाले. श्री संप्रदायाच्यावतीने आज मंगळवार, २५ फेब्रुवारीला राज्यात अनेक ठिकाणी विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.  जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरातही नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायामध्ये विजय वडेट्टीवार यांच्या विधानाबद्दल आक्रोश निर्माण झाला. याचे प्रतिबिंब आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या तीव्र निदर्शने आंदोलनात उमटले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा जिल्ह्यातदेखील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी आणि भक्तांनी कडाडून निषेध केला. विजय वडेट्टीवर यांनी नरेंद्र महाराज यांची सार्वजनिक रित्या माफी मागावी, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारीही यावेळी देण्यात आला. विजय वडेट्टीवार यांनी माफी मागावी अशी मागणी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शिष्य आणि अनुयायांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संघ आणि संघ प्रणित साधू संत यांनी हिंदुत्व वाचविण्यासाठी जनजागरण केले. साधू संत पाठीशी असल्यामुळे महायुतीचा विजय झाला.

नरेंद्राचार्य महाराज यांचेही सहकार्य लाभले असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले. या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर टीका करताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराजांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केले. या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात आता तीव्र पडसाद उमटत आहे.नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी आणि भक्तांनी रस्त्यावर उतरत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बुलढाणा शहरात देखील अनुयायांनी निदर्शने करीत रोष व्यक्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jagadguru narendracharyaji maharaj followers become aggressive against vijay wadettiwar for controversial remark scm 61 zws