बुलढाणा : मानवी आयुष्यात घड्याळाचे अर्थात वेळेचे खूपच महत्त्व आहे. अचूक वेळेवर कोणतेही काम करणे महत्त्वाचे आहे, पण कधी कधी अपरिहार्य कारणांमुळे, कळत नकळत झालेला उशीरदेखील उपकारक ठरतो. बुलढाणा शहरातील जैन परिवाराला याचा जिवंत प्रत्यय आला. तो देखील बुलढाणायापासून हजारो किलोमीटर अंतरावरील आणि भीषण दहशतवादी हल्ल्याचे साक्षीदार ठरलेल्या जम्मू काश्मीरमधील पहेलगाममध्ये. येथे मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बाहेर पडायला जैन कुटुंबीयांना उशीर झाला. याच दरम्यान अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. हॉटेल मालक व प्रबंधक यांनी त्यांना बाहेर जाण्यास मनाई केली. यामुळे ते हॉटेलमध्येच थांबले. जैन कुटुंबीय सुखरूप आहेत. सरकारने आम्हाला येथून तातडीने सुरक्षित ठिकाणी हळवावे, अशी मागणी हादरलेल्या जैन कुटुंबीयांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहेलगाममध्ये काल मंगळवारी दुपारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास ३० पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने देशासह जगात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथील पत्रकार अरूण जैन यांची दोन्ही मुलं, भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय सध्या पहेलगामध्येच अडकलेले आहेत. केवळ १०-१५ मिनीटांच्या फरकाने हुकाचुकीमुळे जैन कुटुंबीय या अतिरेकी हल्ल्यातून बचावले.

अरूण जैन यांचे बंधू निलेश जैन मुंबई येथे जीएसटी अधिकारी आहेत. निलेश जैन, पत्नी श्वेता आणि मुलगी अनुष्कासह जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेत. त्यांच्यासोबत अरूण जैन यांची दोन्ही मुले ऋषभ आणि पारसदेखील आहेत. पाचही जण इतर ठिकाणी भेटी देऊन २१ एप्रिलला पहेलगाममध्ये दाखल झाले होते. पहेलगाममधील हॉटेलमध्ये ते मुक्कामी होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ एप्रिलला पहेलगाम मध्ये फिरण्याचा त्यांचा बेत होता. ते हॉटेलमधून बाहेर पडणार त्याआधीच मिनी स्वित्झर्लंडया साईट सिनच्या ठिकाणी अतिरेक्यांनी गोळीबार करून निष्पाप पर्यटकाचा जीव घेतला.

गोळीबार झाल्याची बातमी हॉटेलमध्ये धडकली आणि जैन खुटुंबीय थांबले. कमी अधिक दहा मिनिटांच्या उशिराने जैन कुटुंबीय अतिरेकी हल्ल्यातून बचावले. दरम्यान, निलेश जैन यांनी सरकारकडे सुरक्षित स्थळी हलविण्याची मागणी केली आहे.

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

बुलढाणा जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पर्यटक व त्यांच्या नातेवाईकांना उद्देशून आवाहन केले आहे. त्यात नमूद केले आहे की, पहेलगाममध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्यांनी तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा फोन नं. ०७२६२ २४२६८३, मो.नं. ७०२०४३५९५४, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष : ०७२६२ २४२४०० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच काश्मीरमधील श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष व हेल्प डेस्क आहे. त्यासाठी ०१९४- २४८३६५१, २४५७५४३ या क्रमांकवर संपर्क साधवा, असेही कळवण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jain family from buldhana survives terrorist attack in pahalgam escapes late from hotel and scm 61 ssb