वर्धा : महात्मा गांधी यांचे मानसपुत्र म्हणून ओळख राहिलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जमनालाल बजाज एक उद्योगपती पण होते. त्यांच्याच आग्रहास्तव महात्मा गांधी हे बजाज यांनी दानात दिलेल्या शेतीवर आश्रमात निवासास होते. याच बजाज कुटुंबातील पुढील पिढी पण उद्योग विश्वात यशस्वी ठरली. पुणे सारख्या शहरात रमलेल्या नंतरच्या पिढीने आपली वर्धेशी नाळ कायम ठेवली. होळी व अन्य सणासाठी हे कुटुंब वर्ध्यात आवर्जुन येत असते. तसेच बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध कामे केली जात आहेतच. आता बजाज उद्योग समूहाची पाचवी पिढी सूत्र सांभाळणार आहे.
समूहाचे अध्यक्ष कुशाग्र नयन बजाज यांची कन्या आनंदमयी बजाज यांची बजाज उद्योगाची उत्तराधिकारी म्हणून घोषणा झाली आहे. त्या या समुहाच्या पहिल्या महिला उत्तराधिकारी ठरणार. त्यांनी कोलंबीया विद्यापीठातून अर्थशास्त्र व गणित विषयात पदवी प्राप्त केली आहे. आनंदमयी या मुंबई मुख्यालयातून प्रथम समूहाच्या विविध उद्योग शाखा प्रशिक्षनार्थी म्हणून समजून घेतील. २०२५ च्या अखेरीस पूर्णवेळ कार्यरत होतील. बजाज एनर्जी, बजाज कन्झुमर, बजाज हिंदुस्थान शुगर सारख्या प्रमुख कंपन्यांचे नेतृत्व हे २२ वर्षीय आनंदमयी यांच्याकडे येणार. या समूहाची ५ बिलीयन डॉलरपेक्षा अधिक संपत्ती असून एकूण १२ हजारवर कर्मचारी कार्यरत आहे.
या बदलावर कुशाग्र बजाज म्हणतात की, आनंदमयीचे पालन पोषण कुटुंबाच्या पारंपरिक संस्कारात झालेले आहे. नवी दृष्टी, खोलवर समज व जमिनीशी घट्ट नाते ठेवून ती येत आहे. तिच्या नेतृत्वात बजाज उद्योग समूह एक नवी उंची गाठणार, असा मला विश्वास वाटतो. तर आनंदमयी म्हणतात की, बजाज उद्योग समूहाशी जुळण्याची बाब अभिमानास्पद आहे. समूहाची उच्च परंपरा पुढे नेण्याचा माझा प्रयत्न राहील. ही एक मोठी जबाबदारी असून ती समर्पण भावनेने मी पार पाडणार.
तर बजाज समूहाने या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करताना नमूद केले की, आनंदमयी बजाज या आपल्या उच्चतम बौद्धिक क्षमता,आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन व कौटुंबिक वारस्याशी दृढ नाते ठेवून आल्या आहेत. त्यांच्यामुळे समूहास नवी ऊर्जा लाभणार. या समूहाकडून प्रामुख्याने साखर, इथेनॉल, वीज व गृहपयोगी वस्तूंचे उत्पादन केल्या जाते. आनंदमयी बजाज या आपले प्रशिक्षणात्मक कार्य मुंबई येथील उद्योगाच्या मुख्यालयातून करणार असल्याचे समूहातर्फे सांगण्यात आले आहे.