नागपूर : कोंढाळी वनपरिक्षेत्रातील शिरमी उपवनातील जाटलापूर–चिखली मार्गावर २१ ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नागपूर येथील शेतकरी रमेश मेश्राम यांच्या सर्वे क्र. १७१/१ मधील फार्महाऊससमोर बसलेल्या शेतकरी चंद्रशेखर व्यंकटराव बल्की (रा. चिखली) यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्या. यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

विलास बापूराव कडवे व चंद्रशेखर बल्की हे रात्री फार्महाऊससमोर बसले होते. विलास कडवे झोपायला गेले तर चंद्रशेखर बल्की तिथेच बसले होते. थोड्याच वेळात चंद्रशेखर यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. पहाटे साडेबारा वाजताच्या सुमारास कडवे बाहेर आले असता, बल्की गंभीर जखमी अवस्थेत मृत पडलेले दिसून आले. घटनास्थळी बिबट्याच्या पाऊलखूणा आढळून आल्या. पोलीस पाटील कमलेश धोटे, सरपंच राजकुमार चोपडे तसेच गावकरी घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एन. नाईक, वनपाल ए. डी. मालके, क्षेत्र संचालक आर. एन. डाखोळे, वनरक्षक अमोल गडगिले, विष्णू सावंत आदी घटनास्थळी दाखल झाले. तसेच चिखलीचे सरपंच राजकुमार चोपडे, पोलीस पाटील कमलेश धोटे, वनकामगार किशोर कुसळकर, पुंडलिक सरोदे तसेच कोंढाळी पोलीस ठाणेदार राजकुमार त्रिपाठी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वन व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने पंचनामा करून मृतदेह काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठविला. घटनेची माहिती मिळताच आमदार चरणसिंग ठाकूर यांनी वनविभागाचे अधिकारी यांच्यासोबत मृतक चंद्रशेखर बल्की यांचे गावी चिखली येथे पोहोचले.

त्यांनी बल्की कुटूंबियांचे सांत्वन करत वनविभागामार्फत मिळालेला दहा लाखाचा धनादेश ‌सुपुर्द केला. तसेच अंत्यसंस्कारासाठी‌ रोख दहा हजार रुपये ‌दिले. उर्वरित १५ लाख रुपयाचा धनादेश कागदपत्रे पुर्ण झाल्यावर देण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण नाईक यांनी सांगितले. यावेळी नागरीकांनी या भागातील हिंस्र प्राण्यांकडून होणाऱ्या त्रासाचा पाढाच वाचला व वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. चंद्रशेखर बल्की हे अल्पभूधारक शेतकरी असून कंपनी बंद झाल्याने मिळेल ते काम करून कुटूंब सांभाळत होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या एका वर्षात कोंढाळी वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट्यांच्या हल्ल्यात ११० पेक्षा अधिक जनावरे मृत पावली. तर आता मनुष्यहानी होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट निर्माण आहे. ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांना कॉलरआयडी बसविणे, संवेदनशील भागात सेन्सर कॅमेरे बसविणे व ग्रामस्थांना पूर्वसूचना मिळेल अशी प्रणाली विकसित करणे यावर वनखात्याने भर द्यावा, अशी मागणी केली आहे.