भंडारा : रुग्णालयात सोनोग्राफी तपासणीसाठी गेलेल्या युवतीचा विनयभंग करणारा साकोली येथील श्याम हॉस्पिटलचा संचालक डॉक्टर देवेश अग्रवाल हा पसार असून मागील पंधरा दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र अजूनही त्याचा थांबपत्ता  लागलेला नाही. आरोपी डॉक्टर विदेशातही फरार होऊ शकतो, असा संशय निर्माण झाल्याने आता भंडारा पोलिसांनी डॉक्टर अग्रवालच्या विरोधात लुक आऊट नोटीस बजावला आहे. यासोबतच त्याच्या शोधासाठी ८ पथके तयार केली असून ती रवाना झाली आहेत.

काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातून एका अतिशय संतापजनक बातमी समोर आली. नऊ जुलै रोजी एक  अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत तपासणीसाठी साकोली येथील श्याम हॉस्पिटल येथे गेली. या दरम्यान तिच्या आईला बाहेर ठेवून सोनोग्राफी करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला डॉक्टरने सोनोग्राफी कक्षात घेतले. यावेळी त्याने सुमारे अर्धा तास या अल्पवयीन मुली सोबत अश्लील कृत्य केले. पीडिताच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी श्याम हॉस्पिटलचे डॉक्टर देवेश अग्रवालच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तवणूक प्रकरणी झालेल्या तक्रारीनंतर डॉक्टर देवेश अग्रवाल याच्याविरुद्ध साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, तेव्हापासून तो फरार आहे. दरम्यानच्या काळात त्याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र न्यायालयाने तो नाकारला.

या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर देवेश अग्रवाल याच्या तपासासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत झाली आहे. लुक आउट सर्क्युलर जारी रण्यात आले असून देशभरातील सर्व पोलिस ठाण्यांना या संदर्भात आता पत्र रवाना झाले आहे. यासोबतच सर्व पोलिस ठाण्यांना वायरलेस वरून सूचना देण्यात आल्या आहेत. या डॉक्टरच्या तपासासाठी यापूर्वी महाराष्ट्रासह मुंबई, मध्य प्रदेश, गुजरात येथे पोलिसांचे पथक जाऊन आले होते, मात्र त्याचा कुठेच शोध लागला नाही. त्यामुळे लुक आउट सर्क्युलर जारी करण्याचा मार्ग पोलिसांना स्वीकारावा लागला.

बँक अकाउंट केले फ्रीज

डॉक्टर देवेश अग्रवाल यांच्या नावे असलेले आणि श्याम हॉस्पिटलच्या नावे असलेले बँक अकाउंट फ्रीज करण्यात आले आहे. पोलिसांनी त्या संदर्भात संबंधित बँकांना पत्र दिल्यानंतर ही कारवाई झाली. यासोबतच त्याच्या रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

तपासासाठी चहू बाजूंनी प्रयत्न सुरू…

डॉक्टर देवेश अग्रवाल हा विदेशात जाऊ शकतो, ही शक्यता गृहीत धरून त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासोबतच ज्या नातेवाइकांनी त्याला आश्रय दिला किंवा पळून जाण्यास मदत केली, त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलमान्वये कारवाई करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक हसन यांनी दिली.

सामाजिक संघटनांचा रोष

या प्रकरणातील आरोपी डॉक्टर अद्याप फरार असून घटनेनंतर पोलीस यंत्रणा युद्ध स्तरावर आरोपी डॉक्टरचा शोध घेत  आहेत. डॉक्टरला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाईची मागणी साकोली येथील सामाजिक संघटनांनी मंत्री, पोलीस महासंचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदने देत आंदोलनाचा इशारा दिला आहे. “हा केवळ एका मुलीचा प्रश्न नसून समाजातील दलित, शोषित, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे.” डॉक्टरच्या प्रतिमेमागे लपलेल्या कृत्याला संरक्षण देण्याचा कुठलाही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सामाजिक संघटनांनी घेतली आहे.