२४ तासांत जवळजवळ दोन अंशाने घट

पावसाने सुरुवातीला दीर्घ प्रतीक्षा करायला लावली आणि परतीच्या मार्गावर असताना तो धो-धो बरसला. थंडीचेही असेच होणार की काय, असे वाटत असतानाच, हळुवार का होईना थंडीची चाहूल लागली आहे.

उत्तरेकडे हिमवृष्टीची सुरुवात झाली की मध्य भारतातही थंडीची चाहूल लागते. उत्तरेकडे सुरू झालेल्या हिमवर्षांवानंतर थंडीची हळुवार चाहूल जाणवायला लागली आहे. दिवसभर काहीच वाटत नसले तरी रात्री थंडगार वाऱ्यांचा स्पर्श नक्कीच जाणवत आहे. पहाटे थंडीचा जोर आणखी जाणवतो. मात्र, सूर्य उजाडल्यानंतर थंडी गायब होते. नोव्हेंबरचा पूर्वार्ध संपल्यानंतरही ऊबदार कपडे आणि शेकोटीची गरज वाटणारी थंडी अजून सुरूच व्हायची आहे. उत्तरेकडे जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड या भागात हलक्या हिमवृष्टीला सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या तापमानातही घसरण होत असून संपूर्ण देशातच थंडीच्या आगमनाचे संकेत मिळाले आहेत. नागपूरच्या तापमानात अवघ्या २४ तासात जवळजवळ दोन अंशाने घट झाली असून किमान तापमान १४.५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.  नागपूर पाठोपाठ गोंदिया आणि ब्रम्हपुरी येथेही किमान तापमान १६ आणि १६.३ अंश सेल्सिअसवर आहे. उर्वरित शहरांमध्ये किमान तापमान १७ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात उपराजधानीने ८० वर्षांतील तापमानाचे सर्व निच्चांक मोडीत काढले होते. पारा ३.५ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. यावर्षी हा निच्चांक मोडणार का, यावर प्रश्नचिन्ह आहे.