नागपूर : सरकारी नोकरीचे अमिष दाखवत थेट मंत्रालयात बनावट मुलाखती आणि नियुक्ती पत्रे देत तरुणांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ठकबाज टोळीतल्या आणखी एकाला आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी वाठोडा येथून अटक केली.

विजय पाटणकर असे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घोटाळ्याचा सूत्रधार लॉरेन्स हेनरी या ठगबाजाला यापूर्वीच मुंबईतून अटक झाली आहे. त्यानंतर सोमवारी झालेली ही दुसरी मोठी अटक आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखेने बेड्या ठोकलेल्या पाटणकर यानेच तरुणाकडून पैसे जमा केल्याचेही पोलीस तपासात आढळले आहे. या प्रकरणात आतापर्यंत फसवणूक झालेले १७ जण समोर आले असून त्यांनी पाटणकरकडेच पैसे दिल्याचे सांगितले आहे. ठगबाजांच्या या टोळीने आतापर्यंत तरुणांची एक कोटी साठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. मात्र घोटाळ्याची व्याप्ती पाहता टोळीने ६० हून अधिक जणांना गंडा घातल्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणूकीची रक्कम २० कोटींच्या वर असल्याचाही आर्थिक गुन्हे शाखेला संशय आहे.

मंत्रालयाच्या सुरक्षेची पोलखोल

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हेरून त्यांना लाखोंचा गंडा घालण्याचा या टोळीने तरुणांची मुलाखत थेट मंत्रालयात घेतल्याचेही उघडकीस आले आहे. त्यामुळे अत्यंत संवेदनशील असलेल्या मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची पोलखोल या फसवणुकीच्या प्रकरणातून झाली आहे.

शिल्पाचा जामीन फेटाळला

म्हाळगी नगरातला रहिवासी लॉरेन्स हेनरी हा घोटाळ्याचा सूत्रधार असून त्याला यापूर्वीच मुंबईतून अटक झाली आहे. लॉरेन्सची फरार पत्नी शिल्पाने न्यायालयाकडे अटक पूर्व जामीन मागितला होता. मात्र न्यायालायने तो फेटाळला आहे. या घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शिल्पासह वसंतकुमार ऊर्फ वसंतराव उदापूर (६०), नितीन साठे (४१), सचिन डोळस (४५) आणि एक शिपाई अद्याप फरार आहेत.

थेट मंत्रालयात बोगस मुलाखती

राहुल तायडे या नागपूरच्या तरुणाची लॉरेन्स हेनरी या ठगबाजाशी २०१९ मध्ये ओळख झाली. लॉरेन्स, त्याची पत्नी शिल्पा आणि सहकाऱ्यांनी राहुल तायडेला सरकारी नोकरीचे अमिष दाखवत वेळोवेळो त्याच्याकडून तब्बल ९ लाख ५० हजार उकळले. मंत्रालयात कनिष्ट लिपिकाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली या टोळीने अनेकांच्या थेट मंत्रालयात मुलाखत घेतल्या. त्याकरता मंत्रालयातील खोटे दस्तावेज, बनावट आयडी कार्डचा वापर केला गेला. मंत्रालयातील कथित अधिकाऱ्यांनी त्याची मुलाखत घेतल्याचे सोंग रचले गेले. नंतर राहुल तायडे यांची मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीही झाली. अनेक दिवस होऊनही आरोपी नोकरीवर रुजू करून घेत नसल्याने तायडे यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या घोटाळ्याला वाचा फुटली.