नागपूर : राज्याची राजधानी मुंबईतल्या संघटीत गुन्हेगारीमुळे १९९० च्या दशकात महाराष्ट्र होरपळत होता. मुंबईत दर तिसऱ्या दिवशी एक उद्योजकाची हत्या होत होती. तीन वर्षांत एकट्या मुंबईत १०१ उद्योजकांची हत्या झाली. ही गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी टाडा, पोटा सारख्या कायद्याची कठोर अमंलबजावणी सुरू झाली आणि पोलिसांनी ९५ गँगस्टरचा खात्मा केला. मुंबई पोलिसांनी विशेषाधिकाराचा वापर करत ६०० गँगस्टरना कारागृहात डांबले. राज्यात २००० पासून बाबा सिद्दीकीचा अपवाद वगळला तर एकही हायप्रोफाईल व्यक्तीची हत्या झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस सध्या हॉलिडेचा आनंद घेत आहे, असे निरीक्षण राज्याचे पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी रविवारी येथे नोंदवले.
सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटरच्या सभागृहात डी. शिवानंदन यांनी लिहीलेल्या द ब्रम्हास्त्र अनलिश्ड या पुस्तकाचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविकातून अनुभव मांडताना सह पोलीस आयुक्त रेड्डी म्हणाले, डी. शिवानंदन यांच्याच कार्यकाळात पोलीस दलात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू होण्याची मला संधी मिळाली. शिवानंदन यांच्याच दूरदृष्टीमुळे पोलिस विभागाचे खऱ्या अर्थाने आधुनिकीकरण सुरू झाले. मुंबईतल्या संघटीत गुन्हेगारीचे कंबरडे मोडताना त्यांनी जे काम केले आहे, ते अतुलनीय तर आहेच. पण पोलिस दलात सेवा देणाऱ्यांसाठी प्रेरणादायी देखील आहे.
पोलिस आयुक्त डॉ. सिंगल म्हणाले, मुंबईतील टोळीयुद्ध हे संपूर्ण पोलिसदलासाठी भयावह स्वप्नाहून कमी नव्हते. टोळ्यांची दहशत मोडून काढताना एन्काऊंट हे उत्तर नसले तरी समाजात कायदा आणि शांततेचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांपुढेही अनेकदा पर्याय उरत नाही. शिवानंदन यांनी कायद्याच्या चौकटीत राहून ही गुन्हेगारी मोडीत काढली. त्याला तोड नाही.
हे पुस्तक एकट्या शिवानंदन यांचे आत्मचरित्र नाही, तर प्रत्येक पोलिसाच्या मनातला हुंकार आहे, असे सुरुवातीलाच नमूद करीत पुस्तकावर भाष्य करताना पोलीस महासंचालक डी. शिवानंदन म्हणाले, १९९० च्या दशकात मुंबईत टोळी युद्धाचा भडका उडणे सुरू झाले. तीन वर्षांत गँगस्टरनी १०१ उद्योगपतींची हत्या केली. दाऊद इब्राहिम, अबू सालेम, मन्या सुर्वे, अरुण गवळी, छोटा राजन, छोटा शकील, मंचेकर, हाजी मस्तान, रवि पुजारी, मन्या डोळस, करीम लाला सारख्या गुंडांनी उच्छाद मांडला होता. दर तिसऱ्या दिवशी एक उद्योगपती भर दिवसा गोळ्या घालून मारला जायचा. ही गुन्हेगारी मोडून काढताना टाडा, पोटा, मोक्का सारख्या कायद्याचा अवलंब करावा लागला. अधर्माविरुद्दच्या युद्धात ज्या प्रमाणे शेवटचा पर्याय म्हणून ब्रह्मास्त्राचा वापर करावा लागतो, त्याच धर्तीवर पोलिसांना एन्काऊंटरचा वापर करावा लागला. यातून ९५ गँगस्टरचा बिमोड करणे शक्य झाले. पोलिसांचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी एन्काऊंटरला खूना सारखी वागणूक देण्याचाही प्रयत्न झाला. पण अखेर आज २५ वर्षांनंतर त्याचे परिणाम दिसत आहेत. बाबा सिद्दीकीचा अपवाद वगळला तर गेल्या २५ वर्षांत एकाही हायप्रोफाईल व्यक्तीची हत्या झालेली नाही. हे संघटीत गुन्हेगारी विरोधात पोलिसांनी राबवलेल्या मोहिमांचे यश आहे. त्यामुळे हे पुस्तक संपूर्ण पोलीस दलातील प्रत्येकाच्या मनातील हुंकार आहे, असेही शिवानंदन यांनी नमूद केले.