चंद्रपूर: कुष्ठरोगाला ‘नोटीफायबल डिसीज’ घोषित करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे हे कौतूकास्पद व सकारात्मक पाऊल आहे. पोलिओ या आजारावर विजय मिळविला त्याप्रमाणे कुष्ठरोगाची सायकल ब्रेक करणे आवश्यक आहे. शासन विविध पातळ्यांवर यासाठी प्रयत्न करित आहेत. मात्र शासनासोबत लोकांचाही सहभाग यात आवश्क आहे. कुष्ठरोगाबद्दल लोकांमध्ये भिती आणि अज्ञान आहे. समाज कुष्ठरूग्णांचा स्वीकार करित नाही. कुष्ठरूग्णांबद्दल लोकांनीच समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत महारोगी सेवा समिती तर्फे संचालित आनंदवनचे कौस्तुभ आमटे यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक आरोग्य विभागाने कुष्ठरोगाला ‘नोटीफायबल डिसीज’ घोषित केले आहे. कुष्ठरोगाचे निदान झालेल्या रूग्णांची नोंद दोन आठवड्यांच्या आत जिल्हा आरोग्य कार्यालय, सहायक संचालक, आरोग्य सेवा, कुष्ठरोग आणि स्थानिक नागरिक आरोग्य अधिकाऱ्यांकडे करणे डॉक्टर आणि आरोग्य संस्थांना बंधनकारक केले आहे. कुष्ठरोगाबद्दल आजही समाजात भिती, गैरसमज आणि अज्ञान आहे. मात्र दिवंगत बाबा आमटे यांनी वरोरा येथे महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून आनंदवनची निर्मिती करून कुष्ठरूग्णांना मायेचा आधार दिला.

लोकांमधील समज, गैरसमज, भिती आणि अज्ञान दूर करण्याचे प्रयत्न केले. दिवंगत बाबा आमटे यांची तिसरी पिढी आज समाजसेवेत सक्रीय आहे. आनंदवनचे पदाधिकारी कौस्तूभ आमटे यांनी कुष्ठरोगाला ‘नोटीफायबल डिसीज’ घोषित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कुष्ठरोग हा गंभीर आजार आहे. मात्र त्यावर उपचार होवू शकतो. मात्र लोकांमध्ये, समाजामध्ये आजही या आजाराबद्दल अनेक समज, गैरसमज आहेत. तेव्हा सर्वप्रथम सर्व गैरसमज दूर करणे आवश्यक आहे.

शासन यासाठी विविध आपल्या स्तरावरून प्रयत्न करित आहेत. मात्र समाजाने आणि लोकांनीही स्वत:हून यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. लोकांनी प्रयत्नकेल्यानंतर कुष्ठरोगाची सायकल ब्रेक करण्यात यश येईल असे कौस्तूभ आमटे म्हणाले. आज आपण पोलियो सारखा आजार दो बुंद जिंदगीके या मोहिमेच्या माध्यमातून हद्दपार करित यश संपादन केले आहे. तेव्हा कुष्ठरोगालाही हद्दपार करायचे असेल हर अशाच पध्दतीने मोहिम राबवावी लागणार आहे. प्रसंगी यासाठी चित्रपट, क्रिकेट, समाजकारण, राजकारण, संगीत, नाटक अशा विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींचीही मदत घ्यावी , त्यांना सहभागी करून घ्यावे असेही आमटे म्हणाले. कुष्ठरोगाच्या मोहिमेत जनतेनेही शासनासोबत उभे राहायला हवे असेही ते म्हणाले. करोना सारख्या भयावह संकटावर आपण विजय संपादन केला. करोना आणि कुष्ठरोग याची तुलना होऊ शकत नाही. मात्र तरीही कुष्ठरूग्णांवर वेळीच उपचार केला गेला.

ज्या व्यक्तीला कुष्ठरोग झाला आहे त्याने ही बाब लपवून न ठेवता सांगितली, त्यावर योग्य उपचार केले, औषधोपचार केला तर हा आजार देखील बरा होवु शकतो. मात्र कुष्ठरोगी समाजाच्या भितीने हा आजार झाल्याची बाब लपवून ठेवतात, त्यामुळे मग हा आजार बळावत जातो, प्रसंगी हाताची, पायाची बोटे वाकडी होणे आणि इतरही गंभीर प्रकार होत जातात. तेव्हा सर्वप्रथम तर आजाराची लक्षणे दिसताच वेळीच उपाय करावा असेही कौस्तूभ आमटे म्हणाले. कुष्ठरोगाने मृत्यु होत नाही, दहा ते पंधरा वर्षात रूग्ण बरा होतो तेव्हा लोकांनी भिती व अज्ञान बाळगू नये असेही ते म्हणाले. आज आनंदवन येथे कुष्ठपिडीतांची संख्या ९५० आहेत.

यातील केवळ २३ रूग्ण आहेत. समाज कुष्ठपिडीतांना स्वीकारत नाहीत म्हणूनच आजार बरा झाल्यानंतरही ही सर्व मंडळी आनंदवनात आहेत. तेव्हा लोकांनी रूग्णांना अशा प्रकारे सोडून देवू नये, त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार झाला तर कुष्ठरोगी बरा होवून घरी जावू शकतो असेही आमटे म्हणाले. ‘नोटीफायबल डिसीज’ घोषित झाल्याने कुष्ठरोगाच्या संसर्गाची साखळी तोडणे, प्रसार शून्यावर आणणे, विकृतीचे प्रमाण शून्यावर आणणे कुष्ठरूग्णाबाबत भिती कमी करण्यात यश येईल असेही आमटे म्हणाले.