नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्राच्या (महाज्योती) यूपीएससी परीक्षेत झालेल्या गैरप्रकारानंतर ती रद्द करण्यात आली. त्यानंतर रविवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वतयारीसाठी घेण्यात आलेल्या उमेदवारांच्या सामायिक परीक्षेमध्ये पुन्हा गोंधळ झाला. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्याची जबाबदारी असलेल्या ज्ञानदीप अकॅडमी, पुणे यांनी त्यांच्या शिकवणीमधील सराव प्रश्नपत्रिकाच सामायिक परीक्षेला दिल्याने अन्य उमेदवारांवर अन्याय झाला. ज्ञानदीप अकॅडमीला प्रशिक्षण केंद्र देण्यावरून आधीच वाद असताना सामायिक परीक्षेमध्येही गोंधळ झाल्याने ‘महाज्योती’ प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्यसेवा परीक्षेच्या उमेदवारांना ‘महाज्योती’च्या वतीने मोफत प्रशिक्षण दिले जाते. यासाठी संस्थेकडून आर्थिक सहाय्यही केले जाते. उमेदवारांची निवड करण्यासाठी रविवारी सामायिक परीक्षा घेण्यात आली. राज्यभरातील विविध केंद्रांवर झालेल्या या परीक्षेची जबाबदारी ही ज्ञानदीप अकॅडमीला देण्यात आली होती. प्रश्नपत्रिकाही या संस्थेलाच तयार करायची होती. ज्ञानदीप अकॅडमी ही एमपीएससीची शिकवणी घेत असल्याने त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षेसाठी देण्यात आलेली प्रश्नपत्रिकाच सामायिक परीक्षेमध्ये वापरली. या परीक्षेमध्ये ज्ञानदीप अकॅडमीच्या सराव प्रश्नपत्रिकेमधीलच सर्व प्रश्न देण्यात आल्याचा उमेदवारांचा आरोप आहे. यामुळे ज्ञानदीप अकॅडमीमध्ये शिकवणी घेणारे उमेदवार सामायिक परीक्षेत सहज उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे. परिणामी, अन्य उमेदवारांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची कठोर चौकशी करून परीक्षा रद्द करावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा >>>डॉ. भैरवी काळे यांना आकाशवाणीची ‘ए’ श्रेणी प्राप्त; विदर्भातील एकमेव…
एकही परीक्षा सुरळीत नाही
‘महाज्योती’कडून एकही परीक्षा सुरळीत घेतली जात नाही, असे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या यूपीएससी परीक्षेतही गोंधळ झाल्याने ती रद्द करण्यात आली. आता ज्ञानदीप अकॅडमीमुळे एमपीएससीच्या परीक्षेतही गोंधळ झाला. त्यामुळे ‘महाज्योती’ परीक्षा घेणाऱ्या संस्थांची निवड कुठल्या आधारावर करते हा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाच्या कारभाराविषयी उमेदवारांना शंका असल्याचा आरोप स्टुडंट राईट्स ऑफ असोसिएशनचे उमेश कोर्राम यांनी केला आहे.
हेही वाचा >>>नागपुरातील मेडिकल रुग्णालयात अद्ययावत ८० खाटांचे ‘पेईंग वार्ड ‘; रुग्णांना अतिरिक्त पैसे देऊन सेवा मिळणार
‘एमपीएससी’ परीक्षेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. त्यासाठी वित्त लेखा अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली असून योग्य कार्यवाही केली जाईल.- राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती.