अमरावती : शहरातील बडनेरा-रहाटगाव वळण मार्गावरील एका फार्म हाऊसमध्‍ये वास्‍तव्‍यास असलेल्‍या पती-पत्‍नीचे मृतदेह रविवारी सकाळी आढळून आल्‍यानंतर एकच खळबळ उडाली. अमोल सुरेश गायकवाड (३२) व शिल्पा अमोल गायकवाड (३०) दोघेही रा. प्रज्वल पाथरे यांचे फॉर्म हाऊस, रहाटगाव रिंग रोड, अमरावती अशी मृतांची नावे आहेत. अमोल गायकवाडने मृत्यूपूर्व लिहिलेली चार ओळींची एक चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली. या दोन्ही घटनांना मी जबाबदार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यामुळे आई, बाबा, पिंकीताई मला माफ करा, मी गुन्हेगार आहे, असे अमोल यांनी या चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. पत्नीची गळा आवळून हत्या केल्यानंतर अमोल याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. रहाटगाव वळण मार्गावरील कल्पदीप मंगल कार्यालयानजीकच्या प्रज्वल पाथरे यांच्या शेतात दुमजली फॉर्म हाऊस आहे. अमोल यांचे वडील सुरेश गायकवाड हे प्रज्वल पाथरे यांच्याकडे दिवाणजी म्हणून काम करतात. ते पत्नी सुनीता (५६), मुलगा अमोल व सून शिल्पा यांच्यासमवेत प्रज्वल पाथरे यांच्या फॉर्म हाऊसमध्येच राहतात.

सुरेश गायकवाड हे तळमजल्यावर तर अमोल व शिल्पा हे पहिल्या मजल्यावर राहत होते. दरम्यान, रविवारी सकाळी सुरेश गायकवाड हे फॉर्म हाऊस शेजारील शिवारात पीक पाहणीसाठी गेले. तर सुनीता गायकवाड या खालच्या खोलीत काम करीत होत्या. सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्या मुलगा अमोलच्या खोलीत गेल्या. त्यावेळी त्यांना अमोल हा गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. तर, सून शिल्पा ही बेडवर मृतावस्थेत आढळून आली.

हा धक्कादायक प्रकार बघताच सुनीता यांनी पती सुरेश यांना आवाज देऊन बोलाविले. त्यानंतर घटनेची माहिती नांदगाव पेठ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.

घटनास्थळाच्या पंचनाम्यादरम्यान पोलिसांनी अमोल यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली एक चिठ्ठी जप्त केली. दोन्ही घटनांना आपण जबाबदार असल्याचे त्यात नमूद असल्याचे नांदगाव पेठ पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी साहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर व ठाणेदार महेंद्र अंभोरे यांनी भेट देऊन पाहणी केली. अमोलने पतीची हत्‍या करून स्‍वत:ला संपविण्‍याच्‍या घटनेमागचे कारण काय, हे गूढ अजूनही कायम आहे. पोलसांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man ends life by suicide after killing wife mma 73 zws