नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली सध्या ढासळली आहे. नागपूर विद्यापीठाने नुकताच बी.ए. प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊनही गैरहजर दाखवण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२१ची ही हिवाळी परीक्षा असून फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली होती. विद्यापीठाने ६ महिन्यांच्या विलंबाने शनिवारी रात्री निकाल जाहीर केले. काही विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी सर्व पेपर दिले. मात्र काहींना एका विषयात तर काहींना दोन विषयात गैरहजर घोषित करण्यात आले. यासाठी विद्यार्थ्यांनी सोमवार आणि मंगळवारी परीक्षा विभागाच्या अनेक फेऱ्या केल्या. मात्र अद्यापही यावर काहीही तोडगा निघालेला नाही. विशेष म्हणजे, नागपूर विद्यापीठाने बी.ए. आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांच्या परीक्षेची जबाबदारी एमकेसीएलकडे सोपवली होती. परीक्षेच्या कामकाजात अनियमितता केल्याप्रकरणी २०१५ साली विद्यापीठ प्रशासनाने या कंपनीला बाहेरचा रस्ता दाखवला होता. मात्र त्यानंतर डॉ.सुभाष चौधरी यांनी कुलगुरू होताच या कंपनीची पुनर्नियुक्ती केली. मात्र प्राधिकरण सदस्यांनी ही नियुक्ती बेकायदेशीर ठरवली. राज्याच्या विधानसभेतही हा मुद्दा गाजला. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कंपनीचे काम काढून घेण्याचे आदेश कुलगुरूंना दिले. मात्र या सगळय़ात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. आधीच निकाल उशिरा आला आणि तोही चुकीचा दिल्याने विद्यार्थ्यांचा प्रचंड मनस्ताप होत आहे.

..तर वर्ष वाया जाणार

परीक्षेला गैरहजर दाखवल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. या परीक्षेचे निकाल हे ६ महिन्यांच्या विलंबानंतर आले आहेत. दरम्यान, बी.ए. अभ्यासक्रमाची उन्हाळी परीक्षा सुरू आहे. अशा परिस्थितीत या गैरहजर दाखवलेल्या विषयाची परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील हिवाळी परीक्षेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु विद्यापीठाचा नियम असा आहे की, जोपर्यंत विद्यार्थ्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या सत्रातील सर्व विषय उत्तीर्ण केले नाहीत, तोपर्यंत त्यांना तिसऱ्या सत्रात प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे निकालात सुधारणा न झाल्यास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many students are absent despite taking exams confusion ba ysh