अमरावती : मेळघाटातील हतरू परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्‍या चार महिन्‍यांपासून अनियमित वीज पुरवठ्यामुळे गावकरी त्रस्‍त झाले असून विजेअभावी उंच टाक्‍यांमध्‍ये पाणी चढत नसल्‍याने भर पावसाळ्यात पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. हातपंपावरून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर गावकऱ्यांना तहान भागवावी लागत आहे. त्यातच दुषित पाणी पुरवठा होण्याचा धोका वाढला आहे.
या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आहे. पण, वीज नाही. विजेअभावी शासकीय कामकाजावर आणि शालेय कामकाजावर देखील परिणाम होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

मोथा गावातील महिलांना देखील हंडाभर पाण्यासाठी गेल्या महिन्यात पायपीट करावी लागली. गावात पाणी येत नसल्याने गावाबाहेर एक किलोमीटर अंतरावरील विहिरीतून पाणी आणावे लागले. हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. चिखलदरा तालुक्यातील चुनखडी, खडीमल, बिछूखेडा, बोराट्याखेडा, रायपुर, रेट्याखेडा, माखला, सोनापुर, एकझिरा यासह अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते. महिला आणि मुला-मुलींना इतर सर्व कामे बाजूला सारुन पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. दूरवर कोठेतरी शेतात जाऊन पाणी आणावे लागते. त्यामुळे महिलांची मजुरी बुडते तर मुले-मुली शाळेत जाण्यापासून वंचित होतात. दुसरे असे की, घनदाट वनराजी आणि वन्यप्राण्यांचा मुक्त संचार या भागात आहे. त्यामुळे घराबाहेर पडून पाण्याच्या शोधात भटकंती करणेदेखील जोखमीचे आहे.

दुसरीकडे, मेळघाटातील २२ गावांत जलजीवन योजनेची कामे गेल्या दोन वर्षांपासून मंदगतीने सुरू असून काही गावांचे पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास जाऊनही वीज जोडणीअभावी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाणीटंचाईमुळे स्वच्छ पाण्याची कमतरता असून दुषित पाणी प्यायल्याने जलजन्य आजार फैलावण्याचा धोका असतो. अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे सुरू असतानाही तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे उद्दिष्ट २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाचे पाणी पुरविणे हे होते. मात्र २०२४ उलटून देखील २२ गावांमध्ये नळयोजना अस्तित्वात आलेली नाही.

…पाण्याच्या टाक्या शोभेच्या वस्तू

मेळघाटातील हतरू परिसरात दोन ग्रामपंचायती आहेत. जवळपास १५ शाळा आहेत. एक आश्रमशाळा आणि एक खासगी शाळा आहे. ‘हर-घर नळ योजना’ पोहचली आहे. काही गावांमध्ये पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. एका गावात तर दोन पाण्याच्या टाक्या उभ्या आहेत. पण, या टाक्यांमध्ये पाणी चढविण्यासाठी वीजच नाही, अशी खंत महाराष्ट्र गाभा समितीचे सदस्य ॲड बंड्या साने यांनी बोलून दाखवली.