नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण ९३८ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५, रविवार, ०४ जानेवारी, २०२६ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. इतक्या मोठ्या पदांसाठी जाहिरात देण्यात आल्याने शेकडो उमेदवारांना यामुळे नोकरीची संधी मिळणार आहे. एमपीएससीच्या इतिहासात ही मोठी जाहिरात मानली जाणार आहे. ही परीक्षा पद्धत कशी असेल, अर्ज प्रक्रिया कशी आहे जाणून घेऊया. या सर्व पदांसाठी ६३ हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचे बेसिक वेतन राहणार आहे.

प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील सोबतच्या परिशिष्ट-एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे. संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येइल. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणा-या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीडारे अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कालावधी : दिनांक ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी ते दिनांक २७ ऑक्टोबर, २०२५ रोजी पर्यंत राहणार आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून परीक्षा शुल्क भरता येणार आहे. आयोगाने नुकताच अर्ज प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. त्यामुळे उमदेवारांनी संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करूनच अर्ज करणे आवश्यक ठरणार आहे.

परीक्षेचे स्वरूप समजून घ्या

महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या गट क सेवांमधील विविध पदांसाठी आयोजित केली जाते. ही परीक्षा साधारणपणे दोन टप्प्यात होते – पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा. पूर्वपरीक्षेत १०० गुणांचे १०० वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, तर मुख्य परीक्षा प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे आयोजित केली जाते. पूर्वपरीक्षा: ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून, सामान्य ज्ञान, सामान्य जागरूकता, सामान्य विज्ञान, मराठी, इंग्रजी आणि चालू घडामोडी या विषयांचा अभ्यासक्रम असतो. मुख्यपरीक्षा: पूर्वपरीक्षेतील पात्र उमेदवारांसाठी ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेसाठी अभ्यासक्रम: सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान, मराठी, इंग्रजी आणि चालू घडामोडी यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. मागील वर्षाचे पेपर: एमपीएससी गट क च्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून परीक्षेचा नमुना समजून घेता येतो.

या पदांसाठी होणार भरती

उद्योग निरीक्षक-९ पदे

तांत्रिक सहायक- ०४ पदे

कर सहायक- ७३ पदे

लिपिक टंकलेखक -८५२ पदे