नागपूर: तुम्ही जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर ही माहिती आपल्यासाठी फार महत्त्वाची राहणार आहे. एमपीएससीने जून २०२२ मध्ये राज्यसेवा परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी २०२३ पासून होणार होती. मात्र एका वर्षातच परीक्षेत इतका मोठा बदल होत असल्याने जुन्या परीक्षा पद्धतीने अभ्यास करणाऱ्यांचे नुकसान होईल, नवीन परीक्षा पद्धती लागू करताना आयोगाने किमान तीन वर्षांचा वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. या बदलामुळे त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागणार होती आणि त्यासाठी पुरेसा वेळही मिळणार नव्हता. त्यामुळे परीक्षेतील नवा बदल हा २०२५ पासून लागू करावा, या मागणीसाठी राज्यातील प्रमुख शहरांत विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. राजकीय पक्षांनीही या आंदोलनांत उडी घेतली होती. राज्य शासनाने मध्यस्थी केली व ‘एमपीएससी’ने राज्यसेवा परीक्षेचे वर्णनात्मक स्वरूप २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, परीक्षेची नवीन पद्धत, नवीन अभ्यासक्रम नेमका कधी लागू होणार?, राज्यसेवा २०२४च्या विद्यार्थ्यांना जागा वाढ मिळणार का? यासंदर्भात एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्णनात्मक परीक्षा कशी घेतली जाईल?

समितीने केलेल्या शिफारशीनुसार ‘सी सॅट’ विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय ‘एमपीएससी’ने घेतला. या समितीच्या कार्यकक्षेत राज्यसेवेची परीक्षा आणि अभ्यासक्रम सुधारणांचाही समावेश होता. या संदर्भातील समितीच्या शिफारशी ‘एमपीएससी’ने स्वीकारल्या. त्यानुसार २०२३ पासून सुधारित पद्धतीत वर्णनात्मक स्वरूपाच्या नऊ प्रश्नपत्रिका असतील. त्यापैकी मराठी आणि इंग्रजी भाषेच्या प्रश्नपत्रिका प्रत्येकी ३०० गुणांच्या असतील. मराठी किंवा इंग्रजी निबंधाची एक, सामान्य अध्ययनाच्या एकूण चार, वैकल्पिक विषयांच्या दोन अशा एकूण सात प्रश्नपत्रिका प्रत्येकी २५० गुणांसाठी असतील. कालानुरूप बदल करून परीक्षा आणि अभ्यासक्रमाची रचना नव्याने करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक गुणवत्ताधारक उमेदवार मिळण्यास मदत होईल. तसेच सुधारित रचनेमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातील उमेदवारांचा टक्का वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा तज्ञांना आहे.

हा बदल अपेक्षित

राज्यसेवा २०२४ ही वस्तुनिष्ठ पद्धतीने झालेली शेवटी परीक्षा आहे. त्यामुळे या परीक्षेत जागावाढ करावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, यासाठी नव्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विरोध असल्याने तुर्तास जागा वाढ मिळणे अशक्य असल्याची माहिती एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. तर खात्रिशील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमपीएससीची वर्णनात्मक परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रमात बदल हा २०२५ पासून लागू होणार आहे. राज्यसेवा परीक्षेची नव्याने जाहिरात लवकरण प्रसिद्ध होणार असून त्यानंतर हा बदल अपेक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc new exam pattern syllabus changes and seats increase dag 87 zws