नागपूर: महावितरणच्या हुडकेश्वर कार्यालयात वीज देयक कमी करण्याच्या मागणीसाठी एक ग्राहक आला. त्याने येथील कर्मचाऱ्याशी वाद घालत त्याला लाथा- बुक्यांनी मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. महावितरणच्या हूडकेश्वर शाखा कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ नरेश प्रकाश धकाते दैनंदिन काम करीत होते. यावेळी मनोज शिवरतन लखोटिया हा व्यक्ती तेथे आला. त्याने माझे वीज देयक कमी करून द्या, अशी मागणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> यवतमाळ: दोन युवकांना देशी कट्टे व जिवंत काडतुसांसह अटक

धकाते यांनी त्याचे देयक बघत त्याला तुम्ही गणेशपेठ येथील वरिष्ठ कार्यालयात जाण्यास सांगितले. तो गणेशपेठ कार्यालयाचा पत्ता लिहून देत असतांनाच लखोटीया यांनी वरिष्ठांचा भ्रमनध्वनी क्रमांक मागितला. धकाते यांनी त्याला आम्हाला मोबाईल क्रमांक वैयक्तिक असल्याने देता येणार नसल्याचे सांगितले. त्यावर लखोटीया यांनी अचानक धकाते यांच्या उजव्या डोळ्यावर हात बुक्क्याने मारहाण केली. इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेत पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लखोटीया याला पकडले. परंतु या घटनेत धकाते यांच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली. ही माहिती हुडकेश्वर पोलिसांना कळवल्यावर त्यांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mseb employee assaulted by power consumers for demanding to reduce bill mnb 82 zws