नागपूर : उकाड्यामुळे बेजार झालेल्या नागपूरकरांना पावसामुळे दिलासा मिळाला खरा, पण कच्चे रस्ते चिखलाने माखले, तेथील खड्ड्यात पाणी साचले. तेथून भरधाव जाणारे दुचाकीस्वार इतरांच्या अंगावर चिखल, पाणी उडवत जात असल्याने अनेकांचे कपडे खराब होत आहे. शुक्रवारी नागपुरातील कळमन्या मार्गावरील रस्त्यावर असा प्रसंग एका दाम्पत्यावर गुदरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी सकाळपर्यंत सुरू होता. नेहमीप्रमाणे रस्त्यावर पाणी साचले, दुपारपर्यंत ते ओसरलेही. पण रस्त्याचे, उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जे कच्चे रस्ते तयार केले तिथली स्थिती गंभीर आहे. पावसाने ते पूर्णपणे चिखलाने माखले आहे. खड्ड्यात पाणी साचले आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पाऊस; काय आहे हवामान खात्याचा अंदाज

शांतीनगरमधील रामसुमेर कुत्ते वाले बाबा आश्रम- कावरापेठ रेल्वे फाटक ते लेकर कलमना रेल्वे स्थानकादरम्यान उड्डाण पुलाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. पुलाच्या बाजूने जाण्यासाठी कच्चा रस्ता तयार करण्यात आला. तेथील खड्ड्यात पाणी साचले व रस्त्यावर चिखल साचला. शुक्रवारी दुपारी रामेश्वरीहून कामठीला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एक दाम्पत्य दुचाकीने निघाले. कळमन्याजवळ पोहोचताच चिखलामुळे त्यांची दुचाकी घसरली व दोघेही पती-पत्नी पडले. त्याच वेळी दुसरी दुचाकी त्यांच्या अंगावर चिखल उडवत गेली. त्यामुळे त्यांचे कपडे व वाहन पूर्णपणे खराब झाले.

हेही वाचा – नागपूर: आज रात्रीपासूनच ‘या’ ठिकाणी पडणार पाऊस

असाच प्रसंग याच ठिकाणी अनेक पादचाऱ्यांवरही गुदरला. कंत्राटदाराच्या नावे बोटे मोडून ते पुढच्या प्रवासाला गेले. शहरातील इतरही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून वाहतूक कच्च्या रस्त्यावरून वळवली आहे. तेथेही हीच स्थिती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mud on the road water and unhappy nagpur people what is the situation cwb 76 ssb