अमरावती : सुमारे चार महिन्‍यांपुर्वी सुरू झालेल्‍या मुंबई-अमरावती-मुंबई विमानसेवेत आठवडाभराचा खंड पडल्‍यानंतर १ सप्टेंबरपासून पूर्ववत सुरू होणार असली, तरी ही विमानसेवा चालविणाऱ्या अलायन्स एअरने येत्या २४ ऑक्टोबर नंतरचे विमान उड्डाणाचे आरक्षण बंद केल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र लवकरच हिवाळी सत्रातील वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून त्यासाठी तूर्तास आरक्षण सेवा स्थगित ठेवण्यात आल्याचे विमानतळ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून ३० मार्च ते २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत देशांतर्गत विमानांच्या उड्डाणांसाठी विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. २६ ऑक्टोबर पासूनच्या हिवाळी सत्रासाठी नवीन वेळापत्रक तयार केले जात आहे. यासंदर्भात येत्या ८ सप्टेंबर रोजी कोलकाता येथे बैठक आयोजित करण्यात आली असून त्यानंतर हिवाळी सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. हिवाळ्यामध्ये विमान उड्डाणाच्या वेळांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा १६ एप्रिलपासून सुरू झाली. दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी ७२ आसनी विमान मुंबईच्या दिशेने आकाशात झेपावते. पण, २२, २५, २७ आणि २९ ऑगस्ट रोजी विमानसेवा बंद होती. उड्डाणे रद्द करण्यामागे ऑपरेशनल समस्या कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले होते. आता १ सप्टेंबरपासून विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. पण अलायन्स एअरच्या संकेतस्थळावर २४ ऑक्टोबरपर्यंतचेच आरक्षण उपलब्ध आहे. त्यापुढील तारखांना आरक्षण उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला. २४ ऑक्टोबरला अमरावती ते मुंबई प्रवासाची सुपर सेव्हर प्रकारातील ७ हजार ३५० रुपये किमतीची चार तिकिटे शिल्लक असल्याचे संकेतस्थळावर शनिवारी दुपारपर्यंत नमूद करण्यात आले होते.

२४ ऑक्टोबरनंतर विमानसेवा बंद पडणार की काय, अशी चर्चा सुरू असतानाच हिवाळी सत्राचे नवीन वेळापत्रक जाहीर होणार असल्याने तूर्तास आरक्षणाची सोय उपलब्ध नसल्याचे विमानतळ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पुन्हा आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.अमरावती ते मुंबई प्रवासभाडे हे सुपर सेव्हर प्रकारात किमान ३ हजार ८४५ रुपये आहे. मात्र ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना जादा पैसे मोजावे लागतात.

नवीन वेळापत्रकाची प्रतीक्षा

मुंबई-अमरावती-मुंबई या विमानसेवेचे हिवाळी सत्राचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे तूर्तास २४ ऑक्टोबरनंतरची आरक्षणाची सुविधा स्थगित करण्यात आली आहे. वेळापत्रक जाहीर झाल्याबरोबर आरक्षण सुविधा सुरू होऊ शकेल.- गौरव उपश्याम, वरिष्ठ व्यवस्थापक, एमएडीसी.