अकोला : श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही याचे एक वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’चा. आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा, यासाठी प्रतिवर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वर्षी २१ ऑगस्टला श्रावण सोमवारी नागपंचमी आहे. या दिवशी काही ठिकाणी मातीचा नाग आणून किंवा नागाच्या छायाचित्राची पूजा करतात, तर काही ठिकाणी वारूळाची पूजादेखील केली जाते. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य मानले जाते, अशी माहिती सनातन संस्थेच्या सुनीता खाडे यांनी दिली.

हेही वाचा – “केंद्र सरकार दुसरे गोध्रा कांड घडविण्याच्या तयारीत,” विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचा आरोप, म्हणाले…

नागपंचमीचा इतिहास आहे. सर्पयज्ञ करणार्‍या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होता. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. ‘नागांतील श्रेष्ठ जो ‘अनंत’ तोच मी’, अशी गीतेत श्रीकृष्ण आपली विभूती सांगतात.

अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात. त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही, असे मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, फोडणी देऊ नये, चुलीवर तवा ठेवू नये आदी संकेत पाळले जाते. या दिवशी भूमिखनन करू नये, असेदेखील सुनीता खाडे यांनी सांगितले.

हेही वाचा – “माझ्या घराचे दरवाजे २४ तास उघडे”, धनंजय मुंडेंच शेतकऱ्यांना भावनिक आवाहन, ४ मुलींच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी

नागदेवतेचे पूजन कसे करावे ?

हळदमिश्रित चंदनाने भिंतीवर अथवा पाटावर नागाचे चित्र काढावे (अथवा नऊ नागांची चित्रे काढावीत.) आणि त्या ठिकाणी नागदेवतेचे पूजन करावे. ‘अनंतादिनागदेवताभ्यो नमः ।’ हा नाममंत्र म्हणत गंध, पुष्प इत्यादी सर्व उपचार समर्पित करावे. ज्यांना नागदेवतेची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य आहे, त्यांनी षोडशोपचार पूजा करावी. ज्यांना नागदेवतेची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य नाही, त्यांनी ‘पंचोपचार पूजा’ करावी. दूध, साखर, लाह्या यांचा तसेच कुळाच्या परंपरेनुसार पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. पूजनानंतर नागदेवतेला प्रार्थना करावी, असे सनातन संस्थेच्या ग्रंथात नमूद आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nag panchami tomorrow know the importance history ppd 88 ssb