नागपूर : देशातील सर्वोच्च वैद्यकीय संस्थांमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) समावेश आहे. परंतु, नागपूर एम्सला सुपरस्पेशालिटी विषयातील तज्ज्ञ डॉक्टर वारंवार जाहिरात दिल्यावरही मिळत नाही. त्याचा परिणाम रुग्णांवरील उपचारावर होत असल्याची चर्चा आहे. अत्यवस्थ रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सेवा आणि येथील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रशासनाकडून मेडिकल ऑन्कोलॉजी, मेडिकल गॅस्ट्रोलॉजी, हिमेटोलॉजी, न्यूरोलाॅजी, न्यूओनेटाॅलाॅजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांसाठी वारंवार जाहिरात देण्यात आली. परंतु, निवडक विषय वगळता डॉक्टरांकडून प्रतिसाद मिळाला नाही. मिळालेल्या डॉक्टरांनीही काही महिने सेवा दिल्यावर विविध कारणे देत सेवा सोडली. सध्या येथे यापैकी काही निवडक डॉक्टर सेवा देत आहेत. परंतु, त्यांना मर्यादा असल्याने खूपच कमी रुग्णांना उपचार पुरवणे शक्य होत आहे. तर काही विषयातील एकही तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांना उपचारासाठी दुसरीकडे पाठवावे लागतात. एम्सच्या स्थायी डॉक्टरांना चांगले वेतन आहे. परंतु कंत्राटी डॉक्टरांना कमी वेतन आहे. या डॉक्टरांना खासगीत सेवा देता येत नाही. दुसरीकडे खासगी रुग्णालयांमध्ये या सुपरस्पेशालिटी डॉक्टरांना खूप जास्त वेतन मिळते. त्यामुळे ते नागपूर एम्समध्ये नोकरी नाकारत असल्याची माहिती आहे. हेही वाचा - अमरावती : दोन चुलत बहिणींचा एकाचवेळी मृत्यू; अन्नातून विषबाधा… रुग्ण इतरत्र पाठवताना आधीच सूचना देणारी यंत्रणा एम्समध्ये सतत रुग्णशय्या हाऊसफुल्ल असतात. या स्थितीत कुणी रुग्ण एम्स रुग्णालयातून मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी रुग्णालयात पाठवायचे असल्यास येथून तातडीने संबंधित विभागातील संबंधित विभागाच्या प्रमुखांना सूचना देणारी यंत्रणा विकसित केली जाईल. त्यामुळे तेथे रुग्ण पोहोचताच तातडीने त्यावर उपचार शक्य होणार असल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले. परिचारिकांची संख्याही कमीच एम्समधील रुग्णशय्यांची संख्या आता ८२० वर पोहोचली आहे. निकषानुसार येथे आता १ हजार परिचारिकांची गरज आहे. प्रत्यक्षात केवळ ५५० परिचारिका आहेत. लवकरच आणखी १०० परिचारिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याची माहिती एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. पी.पी. जोशी यांनी दिली. हेही वाचा - बुलढाणा : जिल्हा शल्य चिकित्सकांना मनमानी भोवली, कर्त्यव्यात कसूर केल्याप्रकरणी… आकस्मिक विभागात रुग्णशय्या वाढवणार एम्समध्ये सध्या ८२० रुग्णशय्येवर रुग्णांवर उपचार होत आहेत. तर येथे एमआयसीयूमध्ये २२, एनआयसीयूमध्ये १४, पीआयसीयूमध्ये ६, सीटीव्हीएसमध्ये ५, केटीयूमध्ये ५ अशा अतिदक्षता विभागातील रुग्णशय्या आहेत. येथील सामान्य रुग्णशय्येवर नित्याने ९२ टक्के तर अतिदक्षता विभागातील रुग्णशय्येवर नेहमीच १०० टक्के रुग्ण उपचार घेत असतात, अशी माहिती डॉ. जोशी यांनी दिली. डॉक्टरांच्या नियुक्तीसाठी पुन्हा प्रयत्न काही विषयातील तज्ज्ञ डॉक्टर मिळाले, परंतु ते लवकरच सेवा सोडून गेले. प्रशासन आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा करून पुन्हा डॉक्टरांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती नागपूर एम्सचे अध्यक्ष डॉ. विकास महात्मे यांनी प्रेस क्लबमध्ये झालेल्या अनौपचारिक चर्चेत दिली.