नागपूर : गुंगीचे औषध देऊन रेल्वे प्रवाशांना लुटणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

लोहमार्ग पोलिसांची बिहार व दिल्ली येथे कारवाई

नागपूर : गुंगीचे औषध देऊन रेल्वे प्रवाशांना लुटणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड
( संग्रहित छायचित्र )

प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशांना खाद्यपदार्थ, पेयातून गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील म्होरक्यांना नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अनुक्रमे बिहार व दिल्ली येथून अटक केली.

रेल्वे प्रवासात मैत्री करून त्यांना खाद्यपदार्थ किंवा शीतपेयांतून गुंगीचे औषध द्यायचे आणि नंतर त्यांच्या मौल्यवान वस्तू, रोकड पळवायची, अशी या टोळीची कार्यप्रणाली आहे. नागपूर लोहमार्ग पोलिसांनी या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आरक्षित डब्यातील चार प्रवाशांना या टोळीने गंडा घातला होता –

मुंबई – हावडा गीतांजली एक्सप्रेसमधील आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांना या टोळीने गंडा घातला होता. चोरट्यांनी प्रथम या प्रवाशांसोबत मैत्री केली. शीतपेय (फ्रुटी) पिण्याचा आग्रह धरला. त्यात त्यांनी गुंगीचे औषध टाकले होते. पेय घेताच ते बेशुद्ध पडले. त्यानंतर टोळीने संबंधित प्रवाशांचे दागिने, रोकड आणि बॅग असा सुमारे तीन लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पळवला. याबाबत तक्रार दाखल झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर यांना सूचना देण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर येथील पथकाने तपास केला.

आरोपींकडून तीन लाख ३७ हजार ५०० रुपये हस्तगत –

मुंबई ते हावडा असे प्रवास करणारे मुसा (३०) व मो. फिरोज (४०) या दोन संशयितांची नावे समोर आली. ते नवी दिल्ली व मालदा (पश्चिम बंगाल) येथील असल्याचे आढळून आले. त्यांनी दिलेले मोबाईल क्रमांक खोटे होते. तसेच आरोपी दुसऱ्याच्या नावाचा वापर करीत होते. खरा आरोपी किशनगंज (बिहार) इस्लामपूर (प. बंगाल) येथील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार शोध पथक किशनगंजला गेले. तेथे मजबुल कुतूबअली (४०) यास अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याआधारे त्याचा साथीदार दिल्ली येथे असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गन्हे शाखा व रेल्वे पोलीस ठाणे, गोंदिया येथील पथक दिल्लीला रवाना झाले. तेथून जहिरूद्दीन (४५) रा. कठलबाडी (पश्चिम बंगाल) यास ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींकडून एकूण तीन लाख ३७ हजार ५०० रुपये हस्तगत करण्यात आले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
गोंदिया : नाल्यावरील रस्ता ओलांडताना चारचाकीसह युवक वाहून गेला; दोघे बचावले
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी