नागपूर : वडिलाने दुसऱ्या महिलेशी घरठाव केला तर आईनेही दुसरे लग्न करुन संसार थाटला. त्यांची १२ वर्षीय मुलगी आईसोबत राहत होती. शेजारी राहणाऱ्या युवकाने तिच्याशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिची आई कामावर गेल्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तब्बल सहा महिन्यांपर्यंत त्या मुलीचे लैंगिक शोषण केले. तिच्या वडिलाच्या घरी गेल्यानंतर मुलगी चोरुन फोनवर बोलताना दिसल्यामुळे वडिलांनी हटकले. त्यांनी आस्थेने चौकशी केल्यानंतर तिने प्रियकराचे नाव सांगितले तसेच लैंगिक शोषणाबाबतही वडिलांना माहिती दिली. दोघांच्या प्रकरणाचे बिंग फुटले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी प्रियकराला अटक केली. अमित सुखदेव इंगळे (२०, रा. जरीपटका) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीपटका परिसरात राहणाऱ्या स्विटीच्या (बदललेले नाव) आई-वडिलांचे आपसात पटत नसल्याने त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. तिच्या वडिलाने दुसऱ्या महिलेशी घरठाव केला तर तिच्या आईनेही एका युवकाशी संसार थाटला. स्विटी ही अधून-मधून वडिलांकडे ये-जा करते. अमित इंगळे हा स्विटीच्या घराच्या शेजारी राहतो. तो बीए. प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. तर स्विटी ही सहाव्या वर्गात शिकत आहे. शेजीरीच राहत असल्याने स्विटी आणि अमितमध्ये बोलचाल होती. यातूनच त्यांच्यात घट्ट मैत्री झाली. स्विटी ही अल्पवयीन आहे याची जाण अमित याला होती. त्यामुळे त्याने तिच्या अजानतेपणाचा गैरफायदा उचलत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांचे मोबाईलवरुन बोलचाल सुरू असतानाच भेटीगाठी वाढल्या. स्विटीची आई कामाला गेल्यानंतर अमित तिच्या घरी यायचा. त्याने स्विटीशी गोड बोलून मोठी झाल्यानंतर लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जवळपास सहा महिने अमितने स्विटीचे लैंगिक शोषण केले.

अशी आली घटना उघडकीस

गेल्या आठवड्यात दिवशी स्विटी ही वडिलांकडे मुक्कामी आली. यावेळी, ती घरात मोबाईलवरुन चोरून बोलत असताना वडिलांना दिसली. तिला विचारणा केली असता तिने उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र, त्यांनी विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने प्रियकर अमितसोबत प्रेमसंबंध आणि लग्न करणार असल्याचे सांगितले. हे ऐकताच वडिलांच्या पायाखालून जमीन सरकली. त्यांनी मुलीसह जरीपटका पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमितविरूद्ध कलम ६४ (१), ६५ (२), ३५१ (२) भान्यासं, सहकलम ४, ६, ८, १०, १२ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत आरोपी युवकाला अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur boyfriend arrested for sexually abusing girl adk 83 ssb