नागपूर : उपराजधानीत प्राण्यांच्या कल्याणासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. ‘राइझ’ या स्वयंसेवी संस्थेद्वारा संचालित ‘राइझ फॉर टेल्स’ या नावाने शहरातील पहिली प्राण्यांसाठी स्मशानभूमी सुरू करण्यात आली. या स्मशानभूमीची संकल्पना एका अत्यंत वैयक्तिक आणि वेदनादायी अनुभवातून जन्माला आली. ‘राइझ फॉर टेल्स’चे संस्थापक आणि समर्थक वैरागडे कुटुंबाच्या पाळीव प्राण्याचे अलीकडेच निधन झाले.
त्यादिवशी जोरदार पाऊस होता आणि त्यांना त्यांच्या प्राण्याला सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी योग्य ठिकाण मिळत नव्हते. या परिस्थितीत त्यांना जाणवले की नागपूरमधील अनेक पाळीव प्राण्यांचे पालकही याच समस्येला सामोरे जातात. त्यांच्या या पाळीव श्वानाच्या स्मरणार्थ आणि कुणालाही अशा असहाय्य स्थितीतून जावे लागू नये म्हणून, नागपूरमध्ये पहिले प्राण्यांसाठी पहिली स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याठिकाणी पाळीव असो वा भटक्या अशा प्रत्येक प्राण्याला सन्मानाने शेवटचा निरोप देता येईल. त्याचवेळी शहरात पहिल्यांदाच जलचिकित्सा सुविधा सुरू करण्यात आल आहे. जखमी, पक्षाघात झालेल्या आणि शस्त्रक्रियेनंतरच्या प्राण्यांसाठीचे आधुनिक पुनर्वसन उपचार, ज्यामुळे त्यांना हालचाल पुन्हा मिळविण्यास मदत होते आणि ते लवकर बरे होतात.
प्राणी बचाव व पुनर्वसन केंद्र
दिवसरात्र सुरू असलेले ‘राइझ फॉर टेल्स’ हे नागपूरमधील एकमेव पूर्ण सुसज्ज प्राणी बचाव व पुनर्वसन केंद्र आहे. येथे शस्त्रक्रियागृह, अनुदानीत बाह्यरुग्ण विभाग, रुग्णांसाठी कक्ष, रुग्णवाहिका आणि नेण्याआणण्याची सेवा, दोन पशुवैद्यक आणि दहा जणांची प्रशिक्षित पशुवैद्यकीय चमू उपलब्ध आहे. किरकोळ जखमांपासून ते गंभीर आपत्कालीन परिस्थितीपर्यंत सर्व प्रकारची सेवा येथे दिली जाते.
संस्थेचे कार्य
अलीकडेच या संस्थेने ‘सहजीवन’ हा मानवी शिक्षण उपक्रम सुरू केला आहे. शाळांमधील सहयोग, जनजागृती व्याख्याने आणि परस्परसंवादी सत्रांद्वारे मुलांमध्ये प्राण्यांविषयी सहानुभूती विकसित करण्याचा उद्देश आहे. या उपक्रमात मुलांना भटक्या प्राण्यांसोबत कसे सुरक्षित आणि शांततेत राहायचे, त्यांचे वर्तन कसे समजून घ्यायचे, कुत्र्याने चावल्यास काय करावे, रेबीजसंबंधी जागरूकता, भारतातील प्राणी संरक्षण कायदे याबाबत मार्गदर्शन केले जाते.
हजारो प्राण्यांचा जीव वाचला
‘राइझ फॉर टेल्स’ने गेल्या पाच वर्षात दहा हजाराहून अधिक प्राण्यांचा जीव वाचवला. पाच हजाराहून अधिक प्राण्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया केली. प्रत्येक प्राण्याला रेबिजमुक्त करणारी लस दिली. ज्यामुळे भटकी प्राणी संख्या आणि मानव-प्राणी संघर्ष कमी झाला. ही नागपूरमधील एकमेव स्वयंसेवी संस्था आहे, जे ससे, मांजरी, कुत्रे यांच्यापासून ते गायी, घोडे, उंट, बैल अशा मोठ्या प्राण्यांपर्यंत सर्व प्राण्यांचा बचाव व उपचार करते.
