Premium

एक वेब डेव्हलपर, दुसरा वसुली एजंट….डॉक्टरला मागितली खंडणी अन्… झटपट पैसे कमावण्याच्या नादात थेट पोहोचले कारागृहात

आरोपींपैकी एक वेब डेव्हलपर आहे तर, दुसरा फायनान्स कंपनीसाठी वसुलीचे काम करतो. दोघांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही

40 lakh extortion money from doctor in nagpur
४० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. (संग्रहित छायचित्र) फोटो सौजन्य : लोकसत्ता टीम

नागपूर: डॉक्टरला ठार मारण्याची धमकी देऊन ४० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. आरोपींपैकी एक वेब डेव्हलपर आहे तर, दुसरा फायनान्स कंपनीसाठी वसुलीचे काम करतो. दोघांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. झटपट पैसे कमावण्याच्या नादात आरोपींनी डॉक्टरला धमकावण्याची योजना बनवली. हर्षद नरेंद्र हटवार (३२) रा. मनीषनगर आणि शुभम संजय मडावी (२९) रा. तकिया, धंतोली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी डॉ. सुनील मोतिराम लांजेवार (६५) रा. रामदासपेठ यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नागपूर: अकरा वर्षीय मुलीवर शेजाऱ्याचा बलात्कार

डॉ. लांजेवार यांचे जनता चौकातील श्रीमान कॉम्प्लेक्समध्ये दादासाहेब लांजेवार रुग्णालय आहे. त्यांची पत्नी छाया सुनील लांजेवार (६४) या सुद्धा डॉक्टर आहेत. गत मंगळवारी आरोपींनी त्यांना व्हॉट्सअॅप कॉल केला होता. रुग्णालय चालवायचे असेल तर ४० लाख रुपये ‘वन टाईम प्रोटेक्शन मनी’ द्यावे लागेल. जर पैसे मिळाले नाहीतर जीवानिशी ठार मारू. तसेच याबाबत पोलिसांना सांगितले तर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. लांजेवार यांनी पोलिसात तक्रार केली. सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदवून लांजेवार दाम्पत्याला सुरक्षा उपलब्ध केली. डीसीपी अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात खंडणी विरोधी पथकाने घटनेचा तपास सुरू केला.

हेही वाचा >>> तरुणींच्या छेडछाडीच्या सर्वाधिक घटना मुंबईत, महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरील आकडेवारी

इंटरनेटवरून काढले डॉक्टरांचे संपर्क क्रमांक शनिवारी दोन्ही आरोपी जनता चौकातील एका पानठेल्यावर असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ तेथे पोहोचून दोघांनाही अटक केली. हर्षद सॉफ्टवेअर आणि वेब डेव्हलपर असून एका कंपनीत काम करतो. शुभम फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करतो. शुभमला परिसरातील रुग्णालय आणि डॉक्टरांची माहिती होती. झटपट पैसे कमावण्याच्या लालसेत दोघांनीही इंटरनेटवरून डॉक्टरांचे नंबर काढले. ३ डॉक्टरांना फोन केला, मात्र कोणीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आरोपींनी लांजेवार यांना कॉल केला असता त्यांनी फोन उचलला. ही कारवाई पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे, सहायक निरीक्षक इश्वर जगदाळे, संतोष जाधव, उपनिरीक्षक बलराम झाडोकर, विजय नेमाडे, चेतन जाधव, नितीन वासने, चंद्रशेखर राघोर्ते, अनंता क्षीरसागर, मिथुन नाइक, पराग ढोक, पुरुषोत्तम नाइक, प्रशांत भोयर आणि रमन खैरे यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur crime branch arrested two for demanding rs 40 lakh extortion from doctor adk 83 zws