नागपूर : शहरातली सर्वांत जुनी व्यापरी पेठ असलेल्या इतवारीत पाय ठेवायला देखील जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे सराफा व्यावसायिकांनी आपला मोर्चा धरमपेठ, गोकूळपेठ, लक्ष्मीनगरात वळवला आहे. बहुतांश राष्ट्रीय- बहुराष्ट्रीय सराफ्यांनी आपली दालने वेस्ट हायकोर्ट मार्गावर थाटली आहे. ज्या इमारतींमध्ये ही दालने आहेत, तेथील बहुतांश व्यापारी संकुलांकडे स्वतःचे वाहनतळही नाही. ज्यांच्याकडे तशी सोय आहे, ते देखील नियमांना हरताळ फासत आहेत. परिणामी या प्रतिष्ठानांमध्ये सोने खरेदीसाठी येणाऱ्यांकडून सर्रास रस्त्यांवर वाहने लावली जात असल्याने या भागातील वाहतूक कोंडी रोजची डोकेदुखी झाली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे सोन्याच्या दुकानांपुढे सायंकाळच्या वेळी भर रस्त्यावर चार चाकी वाहने लावलेली दिसत असतानाही वाहतूक शाखा पोलीस आणि महापालिका प्रशासन डोळ्यांवर पडदा टाकून बसले आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले अधिकारीच सोने व्यावसायिकांपुढे लोटांगण घालत असल्याने सायंकाळच्या सुमारास अर्धा – अर्धा तास वाहनांची कोंडी होत असल्याने रहिवाशांना कर्णकश्य हॉर्नमुळे कानठळ्या बसत आहेत. इतवारीतल्या सराफा ओळीच्या विस्ताराला जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये धरमपेठ, गोकूळपेठ, गिरीपेठ, लक्ष्मीनगर, उत्तर अंबाझरी मार्ग, शंकरनगर, बजानगर, व्हीएनआयटी मार्गावर सोने-चांदीच्या व्यापारी पेठा झपाट्याने वाढल्या आहेत.

सराफा व्यावसायिकांची दादागिरी

बहुतांश राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय ब्रँडची दालने या मार्गावर थाटली गेली आहेत. त्यामुळे साहजिकच येथे येणाऱ्या ग्राहकांची संख्याही वाढली आहे. त्याचा गैरफायदा घेत सोने- चांदीच्या व्यापारी पेठा चालवणाऱ्या व्यावसायिकांनी मनमानी सुरू केली आहे. सोने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहने व्यावसायिक संकुलांमध्ये लावण्या एवजी त्या सर्रास रस्त्यावर लावल्या जातात. त्यामुळे सायंकाळच्या वेळी रस्ते जाम होऊन वाहतूक कोंडी होते. वाहतूक शाखेला ही कोंडी दिसत नाही की अर्थपूर्ण व्यवहारामुळे त्याकडे पोलिसांना पाहायचे नाही, त्यांच्यापुढे महानगर पालिका आणि वाहतूक शाखा पोलिसांनी लोटांगण घातले आहे, का याची शंका नागरिकांना येत आहे.