नागपूर : कबूतरांमुळे होणारे श्वनसनाचे विकार आणि मोकाट श्वानांमुळे घडणाऱ्या अपघातांच्या वाढत्या संख्येवरून सध्या राज्यात एकच गदारोळ उठला आहे. एकीकडे पक्षी आणि प्राणी प्रेमींचा कळवळा असणारे तर दुसरीकडे त्यामुळे माणसांना मोजवी लागणारी किंमत यावरून वादंग माजलेले असतानाच घरात पाळलेल्या श्वानांना अचानक बेवारस करून घर बदलण्याचा प्रताप महिलेला चांगलाच अंगलट आला.

घर बदलल्यानंतर पाळलेले तीन श्वान सोबत घेऊन न जाता ते परिसरात मोकाट सोडून देणे महिलेलाच चांगलेच महागात पडले. तहान आणि भुकेने व्याकूळ या श्वानांची परिसरातील काही नागरिकांनी काळजी घेतली मात्र त्यांचा त्रास असह्य होत असल्याने निर्दयी महिलेविरोधात एकाने पोलिसांमध्ये तक्रारही केली. अखेर पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला.

मानवी संवेदनांना काळीमा फासणारी ही घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. दिनेश चंद्रकांत नायडू (५१, मोहननगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. तर रश्मी समीर बर्वे असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. बर्वे या मोहननगर परिसरातच वास्तव्याला होत्या. त्यांनी घरात तीन श्वान पाळले होते. रोज त्या श्वनांची काळजीही घेत होत्या. मात्र काही महिन्यांअगोदर त्यांनी आपले घर एका व्यक्तीला विकले. मार्च महिन्यात त्या दुसरीकडे रहायला गेल्या. मात्र जाताना त्यांनी पाळलेले तीनही श्वान परिसरात बेवारस सोडन दिले. भुकेने व्याकूळ हे श्वान परिसरातच मोकाट फिरू लागले. प्रसंगी आक्रमक होत ते परिसरातील नागरिकांच्या अंगावर भूंकून धावून जात होते. त्यामुळे मुलांमध्ये दहशत निर्माण झाली. श्वानांच्या हल्ल्याने गंभीर अपघात होण्याचा धोकाही त्यामुळे वाढला. तसेच ते परिसरात घाणदेखील करत होते.

म्हणून दाखल झाला गुन्हा

याचा त्रास असह्य झाल्याने नायडू यांनी अनेकदा बर्वे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. आपण पाळलेले श्वान घेऊन जाण्यास सांगितले. मात्र बर्वे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. बाजुलाच सेंट जोसेफ शाळा आहे. तेथील विद्यार्थ्यांनादेखील धोका असल्याचा दावा करत नायडू यांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यामुळे सदर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम २९१ नुसार आपल्या ताब्यातील पाळीव प्राण्यामुळे मानवी जीवाला धोका निर्माण होईल अशा प्रकारे निष्काळजीपणा केल्याबद्दल बर्वे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी केलेली ही कारवाई सिद्ध झाली तर बर्वे यांना सहा महिन्यांपर्यंतची कैद किंवा पाच रुपयांपर्यंतचा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.