नागपूर : वाढत्या वयानुसार घरात आलेला नवीन पाहुणा (बाळ) हळू- हळू रांगणे, चालने, बोलणेसह इतर गोष्टी शिकत असते. आई- वडीलांसह मिळेल त्यासोबत खेळणे त्यांना आवडते. मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात रांगण्याचे वय असलेला १८ महिन्याच्या बालकाला सर्दी- खोकल्याचा त्रास झाला. त्याला दोषी कफ सिरप देण्यात आले. ते घातल्यावर त्याची प्रकृती जास्तच खालवली. नागपूरातील मेडिकल रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. बालकाचा मृत देह बघून वार्डातील डॉक्टर- कर्मचार्यांचेही डोळे अश्रुने डबडबले.
नागपूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) आणि इतर खासगी रुग्णालयांत आजपर्यंत छिंदवाडा परिसरातील कफ सिरप प्राशन केलेले एकूण ३६ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी १५ रुग्णांचा मृत्यू झाला. सर्व रुग्ण दोन ते १६ वर्षे वयोगटातील आहेत. नागपूरातील विविध रुग्णालयांत दगावलेल्यांपैकी १२ रुग्ण छिंदवाडा परिसरातील तर एक रूग्ण शिवनी येथील आहे.
कफ सिरपशी संबंधित रुग्णांच्या स्वतंत्र नोंदी ठेवण्याची तरतूद नसल्याने अचूक आकडेवारी पुढे येत नव्हती. परंतु, नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेत शहरातील विविध रुग्णालयांशी समन्वय साधून आकडेवारी गोळा केली. तूर्तास शहरात ८ रूग्ण दाखल आहेत. त्यापैकी ४ रुग्ण जीवनरक्षण प्रणालीवर आहेत. सर्वाधिक रुग्ण मेडिकल या एकाच रुग्णालयात आहेत.
‘सिरप’वर बंदीनंतर रुग्णसंख्या घटली
मध्य प्रदेश सरकारने ‘कोल्ड्रिफ’ या कफ सिरपवर बंदी घातली आहे. या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल (डीईजी)चे प्रमाण ४६ टक्के आढळले होते. ते प्रमाणापेक्षा अधिक आहे. रुग्णांना सिरप देणे बंद झाल्याने रुग्णांची संख्या कमी झाली, असे निरीक्षण नागपूरातील वैद्यकीय क्षेत्राकडून नोंदवण्यात आले.
नागपूर महापालिकेतील मुख्य वैद्यकीय अधिकारी काय म्हणतात ?
नागपुरातील विविध रुग्णालयांत मध्य प्रदेशातून एकूण ३६ रुग्ण आले. त्यापैकी १५ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू अंकेक्षणात मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. सध्या ८ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत, अशी माहिती नागपूर महापालिकेतील मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली.
मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री काय म्हणतात ?
छिंदवाडातील कफ सिरप प्रकरणात औषध कंपनी, डॉक्टर तसेच संबंधितांची कसून चौकशी सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल.
नागपुरातील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर छिंदवाडा जिल्ह्यातील ६०० क सिरपच्या बाटल्यांपैकी ४४३ बाटल्या जप्त केल्या आहेत. ज्या मुलांवर उपचार सुरू आहेत त्यांना योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. एकाच डॉक्टराचे नाव येत असल्यामुळे त्या डॉक्टरची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती नागपुरातील मेडिकलला भेट दिली असता मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेंद्र शुक्ल यांनी दिली.