नागपूर : सरकारी जमीन हेरून तिच्यावर कब्जा करीत जमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत आर्थिक गुन्हे शाखेने तीन जणांना अटक केली. या टोळीने बनावट कागदपत्रे तयार करून सरकारची ३ कोटी ८३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या टोळीने आणखी काही सरकारी जमिनींमध्ये असाच गैरव्यवहार केल्याची शक्यता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

जफर उल्लाह खान अमानुल्लाह खान, शादाब खान वल्द हिदायतुल्लाह खान, वकील अहमेद अब्दूल करीम शेख अशी गुन्हे शाखेने अटक केलेल्या भूमाफिया टोळीतल्या सदस्यांची नावे आहेत.

पीडित शाहनवाज आलम हकीम अन्सारी यांनी २०१० मध्ये या तिघांकडून मौजा भांडेवाडी येथे भूखंड क्रमांक १६ खरेदी केला. त्यानंतर २०१७ मध्ये त्याला त्याची जमीन जास्त असल्याचे सांगत भूखंड क्रमांक २२८ देखील विकला. नंतर, तिघांनी शाहनवाजला त्याच्याकडे आणखी ४४ अतिरिक्त भूखंड असल्याचे सांगून फसवले. शाहनवाजने पुन्हा १३/अ आणि १४/अ हे भूखंड नोंदणी करीत काही रक्कम दिली. भूमाफिया टोळीने शाहनवाजला चांदमारी रोडवरील पाच एकर जमिनीत रिकामे तीन भूखंड खरेदी करण्यास तयार केले. शाहनवाज आणि त्याचा मित्र शहजादा अन्सारी यांनी एक कोटीत खरेदी करारही केला, त्यापैकी शाहनवाज यांनी ५२ लाख ७१ हजार रुपये धनादेशाद्वारे दिले. नागपूर सुधार प्रन्यासचे अतिक्रमण हटाव पथक ६ जानेवारी २०२५ ला भुखंडावर दाखल झाले. त्यांनी ही जमीन एनआयटीची असून ती १९६१ मध्ये ती सांडपाणी आणि कचरा संकलनासाठी राखीव होती, असे सांगितले. चौकशीत या भूखंड माफियांनी या जमिनीसाठी आधीच १८,६८८ रुपयांची भरपाई मिळवल्याचेही आढळले. त्यातले दोन भूखंड १३/अ आणि १४/अ साहिल इक्बाल शब्बीर शेख नावाच्या व्यक्तीला विकण्यात आले.

या भूखंड माफियांनी खसरा क्रमांक ११६/१, ११७/१ आणि ११७/२ मधील सरकारी जमीन स्वतःची असल्याचा दावा करून बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती लोकांना विकली. साई रत्न डेव्हलपर्सनेही खसरा क्रमांक ११७/१ मधील भूखंड वाटून फसवणूक केली. आरोपींनी नागपूर सुधार प्राण्यास आणि महानगरपालिकेच्या मालकीच्या खसरा क्रमांक ११६/२ आणि ११६/३ चे बनावट सातबारा कागदपत्रे तयार केली आणि ती खरी असल्याचे सांगून एकूण सरकारची १ कोटी ३४ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. पीडित शाहनवाज अन्सारी यांच्या तक्रारीवरून १६ एप्रिल २०२५ ला वाठोडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्या आधारे तिघांनाही अटक केली. सध्या त्यांना न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.