नागपूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिक, माजी नगरसेवक व राजकीय पक्षांकडून एकूण ११५ आक्षेप नोंदविण्यात आले होते. या आक्षेपांवर निवडणूक आयोगाने सुनावणी घेतली असून काही किरकोळ बदल करून अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. मात्र, बहादुरा हा वादग्रस्त ग्रामीण भाग शहरात समाविष्ट करण्याच्या निर्णयावर आक्षेप नोंदवल्यावर तो तो वगळण्यात आला आहे.

महापालिका निवडणूक पुढील वर्षी जानेवारीत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांना त्यांच्या प्रभागाबाबत स्पष्टता येण्यास मदत होणार आहे. दरम्यान, भाजपचे माजी नगरसेवक विजय उर्फ पिंटू झलके यांनी प्रभाग क्रमांक २८ संदर्भात आक्षेप घेतला होता. त्यांच्या मते, दिघोरी आणि वाठोडा या भागांचे सीमांकन चुकीचे करण्यात आले असून वाठोड्याच्या ५० घरांमधील २०० मतदारांना प्रभाग २८ मध्ये सामील करण्यात आले आहे. यासोबतच बहादुरा सारख्या ग्रामीण भागाला दिघोरीमध्ये दाखवून प्रभाग २८ मध्ये समाविष्ट करण्यात आल्याने चुकीची रचना तयार झाली आहे. या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून नव्याने सीमारेषा निश्चित करण्यात याव्यात, अशी त्यांची मागणी होती. यावर आयोगाने बहादुराचा भाग वगळण्याचा निर्णय घेतला असून, प्रभाग २८ च्या दक्षिणेकडील ग्रामीण हद्दीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी शेवटच्या दिवशी विधानसभा मतदारसंघांच्या आधारावरच प्रभागरचना करावी, अशी भूमिका मांडली होती. यामुळे नागरिकांना व लोकप्रतिनिधींना कार्यवाही करताना अधिक सुसूत्रता राहील, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, या हरकतीची दखल घेतली गेली नाही.

दरम्यान, काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य ॲड. अभिजीत वंजारी यांनी प्रभाग क्रमांक २६ आणि २७ बाबत आक्षेप घेतले होते. त्यांनी सुमारे सात हजार लोकसंख्या असलेले क्षेत्र प्रभाग २६ मधून काढून २७ मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती. मात्र, ही तक्रारही आयोगाने फेटाळली. अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर काही असंतोष शिल्लक असला तरी बहुतेक आक्षेपांची दखल न घेता ती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी आता पुढील टप्प्यांना वेग मिळणार आहे.

शिवणगाव वस्ती आणि पुनर्वसनातील मतदारांचे मतदान कुठे?

दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ३५ आणि ३८ मध्ये येणाऱ्या शिवणगाव वस्ती व शिवणगाव पुनर्वसन परिसरातील मतदार नेमके कुठे मतदान करतील, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. प्रभाग रचनेनुसार शिवणगाव पुनर्वसन परिसरातील नागरिक प्रभाग क्रमांक ३५ मध्ये आणि शिवणगाव वस्तीमधील नागरिकांचा समावेश प्रभाग क्रमांक ३८ मध्ये करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात शिवणगाव वस्तीमधून किती नागरिक अजूनही तेथे वास्तव्यास आहेत आणि किती नागरिकांचे पुनर्वसन होऊन ते नव्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या प्रभागात किरकोळ बदल

प्रारूप प्रभाग ६ मधील अशोकनगरचा भाग ७ मध्ये, तर ७ मधील मठ मोहल्ला ९ मध्ये स्थानांतरित करण्यात आला आहे. तसेच प्रभाग १९ मधील हंसापुरीचा काही भाग ८ मध्ये हलविण्यात आला आहे. या सर्व बदलांमुळे प्रभागांची लोकसंख्या निवडणूक आयोगाच्या किमान व कमाल मर्यादेत राखण्यात आली आहे.