लोकसत्ता टीम
नागपूर : नागपुरातील वाढत असलेले तापमान बघता महापालिकेतर्फे नागरिकांसाठी विविध स्तरांवर उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सर्व विभागांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यात आरोग्य विभाग, उद्यान विभाग, समाजविकास विभाग, जलप्रदाय विभाग,आपत्ती व्यवस्थापन विभागासह इतर सर्व विभागांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अशी घ्या काळजी
नागरिकांनी कामाशिवाय उन्हात निघायचे टाळावे. उन्हात जाण्याचे वेळ आल्यास योग्य खबरदारी घेतली जावी. उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी, हलकी, पातळ व सच्छिद्र कपडे वापरावीत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बूट किंवा चप्पलचा वापर करावा, प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर करावा. ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमीत पिणे, घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करावा.
हे करणे टाळा
उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे, उन्हात कष्टाची कामे करणे टाळा, लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका, गडद, घट्ट व जाड कपडे परिधान करणे टाळावे, उन्हात स्वयंपाक करणे टाळावे, स्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे व खिक्या उघडी ठेवावीत, मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळावी, शिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळावे.
नागपूरचे तापमान मार्चमध्ये ४१ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. सकाळपासून उन्हाचे चटके जाणवत आहे. दुपारीतर उन्हामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे. परंतु अत्यावश्यक कामे करायवचे असलेल्यांना आणि चाकरमान्यांना बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही.
महापालिका सर्व बांधकाम मजुरांना दुपारची सुट्टी देण्यात येणार आहे. तसे आदेश निर्गमित झाले असून त्याचे पालन सुद्धा करण्यात येत आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागातर्फे बेघर नागरिकांची निवारा केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे इमारतीत, गोदामात अथवा कारखान्यात आग लागण्याच्या घटना बघता आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे अग्निशमन यंत्रणा वेळेवर उपलब्ध होईल याची सूचना देण्यात आली आहे. विद्युत विभागातर्फे दुपारच्या वेळी वीज जाणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आली आहे. परिवहन विभागानेही शहर बस स्थानकांवर सावली व पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.
© The Indian Express (P) Ltd