नागपूर : शहर पोलीस दलात नवनियुक्त झालेल्या पोलीस उपायुक्त रश्मीथा राव यांनी पदभार स्वीकारताच पार्वतीनगरातील एका वरली-मटका अड्ड्यावर छापा घातला. या जुगार अड्ड्याचा संचालक चक्क अजनी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्माचारी निघाला. मनोहर मुलमुले (४२) असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्यासह भागीदार मंगेश बावने (४०) रा. बेलतरोडी, मनीष प्रजापती (२६) रा. हुडकेश्वर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

आरोपी मंगेश आणि मनीष हे दोघेही सट्टाअड्डा चालवित असल्याची गोपनीय माहिती नवनियुक्त पोलीस उपायुक्त रश्मीथा राव यांना मिळाली. त्यांनी लगेच एक पथक तयार करून धाड मारली. पोलीस पथकाने पार्वतीनगरातील आरोपींच्या अड्ड्यावर झडती घेतली. यावेळी आरोपी स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता सट्टापट्टीवर लोकांकडून पैसे स्वीकारून खायवाडी करीत असल्याचे मिळून आले. मंगेशजवळून आकडे लिहलेल्या २५१ चिठ्ठ्या, ४५० रुपये, मोबाईल, पेन मिळाला. तसेच मनीष जवळ १७० रुपये, भ्रमणध्वनी मिळाला.

हेही वाचा – पुण्यासाठी ‘वंदे भारत’ नाही, पण ही विशेष गाडी धावणार

मंगेशचा मोबाईल तपासला असता त्यात धक्कादायक खुलासे झाले. अजनी ठाण्यातील पोलीस शिपाई मनोहर हा आरोपींच्या सतत संपर्कात होता. आरोपी मनोहर यांच्यात अनेकदा ‘ऑनलाईन ट्रान्जेक्शन’ झाले आहेत. आरोपीने मनोहरला आणि मनोहरने आरोपीला रक्कम पाठविली असून लगवाडीच्या नोंदीसुद्धा आढळल्या.

विशेष म्हणजे, धाड पडली त्याच वेळी मनोहरने फोन करून त्याच्याशी संपर्क साधला. या प्रकरणी पोलीस शिपायासह तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपायुक्त रश्मीथा राव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार नितीनचंद्र राजकुमार, उपनिरीक्षक सुशांत उपाध्ये, अंमलदार चेतन एडके यांनी केली.

‘सीडीआर’ काढल्यास खळबळजनक उलगडा

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अ‌वैध दारुविक्री, वरली-मटका, गांजा विक्री, भंगार विक्रेता, देहव्यापार आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या काही आरोपींसोबत पोलीस ठाण्यातील आणखी काही पोलीस कर्मचाऱ्यांचे संबंध आहेत. जर पोलीस उपायुक्तांनी डीबी पथकातील काही कर्मचाऱ्यांचे आणि गस्त घालणाऱ्या काही कर्मचाऱ्यांच्या भ्रमणध्वनीचे ‘सीडीआर’ काढल्यास खळबळजनक उलगडा होईल, अशी माहिती ठाण्यातील सूत्रांनी दिली.

हेही वाचा – “आई-बाबा सॉरी, मला अभ्यासाचे टेंशन…” विद्यार्थिनीच्या आत्महत्येने चंद्रपुरात खळबळ

अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही

पुढील कारवाईच्या दृष्टीने खायवाडी करणाऱ्यांकडे धाड मारल्यानंतर आरोपींचा मोबाईल तपासला जातो. या प्रकरणातही आरोपीचा मोबाईल तपासल्यानंतर अजनी ठाण्याचा पोलीस शिपाई त्यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. परिमंडळाअंतर्गत कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतल्या जाणार नाही. अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. – रश्मीथा राव (पोलीस उपायुक्त)