नागपूर : राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची पदोन्नती गेल्या दोन वर्षांपासून रखडली होती. मात्र, आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पाच दिवसांपूर्वी गृहमंत्रालयाने राज्यातील ५०० पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नतीची यादी जाहीर करण्यात आली. बहुप्रतिक्षेत असलेल्या उपनिरीक्षकांच्या खांद्यावर अखेर “तिसरा स्टार’ लागल्याने पोलीस अधिकाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा विषय ‘लोकसत्ता’ने लावून धरला होता, हे विशेष.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य पोलीस दलातील उपनिरीक्षकांची १११ आणि ११२ क्रमांकाच्या तुकडी गेल्या दोन वर्षआंपासूनच पदोन्नतीच्या कक्षेत होती. मात्र, गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयात योग्य समन्वय नसल्यामुळे पदोन्नतीला खिळ बसली होती. त्याचा फटका शेकडो पोलीस अधिकाऱ्यांना बसला होता. तसेच १०३ तुकडीचे पोलीस अधिकाऱ्यांपूर्वी पदोन्नती मिळविण्यासाठी काही अधिकारी न्यायालयात गेले होते. त्यामुळे राज्यातील सर्वच पदोन्नती प्रक्रिया रखडली होती. शेवटी न्यायालयाच्या आदेशाने पदोन्नती प्रक्रिया करण्यात आली. राज्यातील सर्वात वरिष्ठ असलेले पोलीस अधिकारी (१११ तुकडी) हे गेल्या २०२२ पासून पदोन्नतीच्या कक्षेत होते. मात्र, त्यांच्या पदोन्नती प्रक्रियेकडे पोलीस महासंचालक कार्यालयाने दुर्लक्ष केले. पोलीस अधिकाऱ्यांनी महासंचालक कार्यालयात वारंवार पाठपुरावा केला. तसेच ‘लोकसत्ता’ने अधिकाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वृत्त मालिका प्रकाशित केली होती. अखेर स्वातंत्र्य दिनाच्या पाच दिवसांपूर्वी राज्यातील ५०० पोलीस उपनिरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. यामध्ये सर्वाधिक अधिकारी मुंबई, पुणे आणि नाशिक आयुक्तालयातील आहेत.

हेही वाचा…भंडाऱ्यात रक्तरंजित थरार… जन्मदात्या बापाकडून मुलाची निर्घृण हत्या

पदोन्नतीत तीन तुकडीतील अधिकारी

राज्य पोलीस दलातील १११ क्रमांकाच्या तुकडीतील सर्वाधिक ३२५ पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली. तसेच ११२ तुकडीतील १४० अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याता आली. तसेच ११३ तुकडीतील २५ पोलीस उपनिरीक्षकांनाचाही पदोन्नतीमध्ये समावेश करण्यात आला आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाने ६७८ सहायक निरीक्षकांची पदे रिक्त असताना ६३८ उपनिरीक्षकांना संवर्ग मागितला होता. मात्र, पदोन्नती फक्त ५०० अधिकाऱ्यांना दिली आहे. उर्वरित १३८ उपनिरीक्षकांचा मात्र यावेळी हिरमोड झाला आहे.

हेही वाचा…“गडचिरोलीतील खनिजांवर सरकारचा डोळा,” वांडोली चकमकीवरून नक्षलवाद्यांची आगपाखड

हवालदार अजुनही पदोन्नतीच्या प्रतीक्षेत

राज्य पोलीस दलात २०१३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पात्र असलेल्या जवळपास ५ हजार कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र, अजूनही जवळपास ७ ते ८ हजार पोलीस कर्मचारी विभागीय कोट्यातून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी १२०० कर्मचाऱ्यांची यादी महासंचालक कार्यालयाकडून जाहिर करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी केवळ ६१० कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली होती. त्यामुळे उर्वरित ६०० कर्मचाऱ्यांची निराशी झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur promotion of 500 police sub inspectors announced after 2 year delay adk 83 psg