नागपूर : सोमवारी उसळलेल्या दंगलीच्या घटनेनंतर शहरातील पोलिसांनी ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संचारबंदी उठविण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार रविवारी दुपारी तीन वाजतापासून संपूर्ण शहरातील संचारबंदी हटवण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी उपाययोजना म्हणून शहरातील ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. मात्र, दंगलग्रस्त भागाशिवाय अन्य परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. त्यामुळे टप्प्याटप्य्याने संचारबंदी उठविण्यास पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली होती. गुरुवारी नंदनवन व कपिलनगरमधील संचारबंदी पूर्णत: हटविण्यात आली. तर शनिवारी पुन्हा पाच ठाण्यांतर्गत संचारबंदी पूर्णत: हटविण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले. यामध्ये परिमंडळ ३ अंतर्गत येणाऱ्या पाचपावली, शांतीनगर, लकडगंज तसेच परिमंडळ ४ अंतर्गत येणाऱ्या सक्करदरा आणि इमामवाडाचा समावेश आहे. मात्र, यशोधरानगरात संचारबंदी कायम ठेवण्यात आली होती. कोतवाली, तहसील, गणेशपेठमध्ये सायंकाळी ७ ते रात्री १० वाजतापर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती.

बहुतांश भाग बाजारपेठांचे आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचीदेखील शाळा बुडत होती. त्यामुळे शनिवारी पोलीस आयुक्तांकडून स्थितीचा पुन्हा आढावा घेण्यात आला. त्यानंतर त्यांनी पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा आणि इमामवाडा ठाण्यांतर्गत संचारबंदी पूर्णत: हटविण्याचे निर्देश दिले. परिमंडळ तीनमधील कोतवाली, तहसील, गणेशपेठ हद्दीतील संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली. सायंकाळी ७ ते रात्री १० या कालावधीत लोक बाहेर पडू शकतात आणि या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येऊ शकते, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले होते. तरीही अनेकांना सामान्य जीवन जगताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी रविवारी दुपारी तीन वाजतापासून शहरातील संपूर्णतः संचारबंदी हटवली. तसे आदेश पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी जारी केले.

पोलीस बंदोबस्त कायम

भालदारपुरा, मोमीनपुरा, चिटणीस पार्क चौक, हंसापुरी यासह अन्य तणावग्रस्त भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. या भागातील संचारबंदी उठवली तरी सशस्त्र जवान अजुनही रस्त्यावर कायम ठेवण्यात आले आहे. तसेच पोलिसांची गस्तसुद्धा या परिसरात वाढविण्यात आली आहे. संचारबंदी हटवल्यानंतरही कुणी संशयास्पद स्थितीत फिरताना आढळल्यास किंवा संशयास्पद हालचाली करीत असल्यास ताबडतोब ताब्यात घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur riot latest updates curfew lifted across nagpur city adk 83 css