नागपूर : राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ साठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली. नागपूरच्या वैष्णवी हरिभाऊ बावस्कर हिने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. आता उमेदवारांना आपल्या पदांचे पसंतीक्रम द्यावे लागणार असून त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे. वैष्णवी बावस्कर सध्या मंत्रालयातील गृह विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी आहे. आता तिची निवड उपजिल्हाधिकारी म्हणून झाली आहे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत यश

वैष्णवी बावस्करची सहा महिन्यांपूर्वीच मंत्रालयातील गृह विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर निवड झाली. गुरुवारी जाहीर झालेल्या एमपीएससी परीक्षेतही तिने बाजी मारली. वैष्णवी बावस्करचे मार्गदर्शक विशाल नागपुरे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले की, वैष्णवीने हे यश अत्यंत हलाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करून मिळवले आहे. २०१९ ला तिच्या वडिलांचे छत्र हरवले. आई एका खासगी रुग्णालयात कामाला होती. आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर असतानाही वैष्णवीने अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून कठोर परिश्रम घेतले व आज एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली.

हेही वाचा : MPSC Results: राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर; नागपूरची वैष्णवी बावस्कर मुलींमध्ये अव्वल

विद्यार्थ्यांना दिला हा संदेश

आज स्पर्धा परीक्षेची अनेक विद्यार्थी तयारी करतात. हे करत असताना काहींना यश तर काही नाही येत नाही. मात्र अपयशाने खचून न जाता प्रयत्न करत राहणे हा एक यशाचा मार्ग आहे. एमपीएससी ही साधारण परीक्षा नाही, यासाठी सातत्य ठेवून प्रत्येक परीक्षेपासून नवीन शिकत जाणे आवश्यक आहे. आपल्या चुकांमधून शिकत जाऊन आपण पुढच्या परीक्षेसाठी अधिक तत्परतेने तयार होतो. अभ्यासाचे सातत्य हे यशस्वी होण्यासाठी फार आवश्यक आहे असा सल्ला वैष्णवीने दिला.

दुसरा पर्याय सोबत ठेवा – वैष्णवी

स्पर्धा परीक्षेची तयारी ही लगेच होणारी नाही. यासाठी बराच परिश्रम आणि अनेक वर्ष द्यावे लागतात. त्यामुळे परीक्षेची तयारी करताना राज्यसेवेसोबत दुसऱ्या परीक्षांच्या अभ्यासाची तयारी ठेवा असा सल्ला वैष्णवीने दिला. वैष्णवीने शासकीय विज्ञान महाविद्यालयातील फॉरेन्सिक सायन्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. आणि २०१९ पासून एमपीएससीची तयारी सुरू केली. चार वेळा परीक्षा आणि दोन वेळा मुलाखतीही दिल्या. त्यानंतर वैष्णवीला उपजिल्हाधिकारी पदापर्यंत यश मिळवता आले. जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास, मोठ्यांचे मार्गदर्शन आणि लोकसत्ता सारख्या वृत्तपत्राचे नियमित वाचन हे एमपीएससीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे वैष्णवी ने सांगितले.

हेही वाचा : Saoner Vidhan Sabha Constituency : सुनील केदार यांना पर्याय कोण? भाजप, काँग्रेस दोघांपुढेही उमेदावर देण्याचे आव्हान

अशी राहणार पुढची प्रक्रिया

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२३ साली गट अ आणि गट ब दर्जाच्या ३०३ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. उमेदवारांना लवकरच पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. पालघरच्या अमित मोतीराम भोये याने अनुसूचित जमाती प्रवर्गातून चौथा क्रमांक पटकावला आहे.

हेही वाचा : राज्यातील पहिला तरंगता सौरऊर्जा प्रकल्प आर्वीत साकारणार

विविध न्यायालयात, न्यायधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना लवकरच पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur s vaishnavi haribhau bavaskar tops in mpsc exam success story dag 87 css