नागपूर : मानव-वन्यजीव संघर्ष जंगलालगतच्या गावांपुरताच मर्यादित राहिलेला नसून शहरातील पायाभूत सुविधादेखील वन्यप्राणी आणि पक्ष्यांना जखमी करण्यास कारणीभूत ठरत आहेत. मात्र, नागपूर प्रादेशिक वनखात्याअंतर्गत सेमिनरी हिल्सवरील भारतातील पहिले ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्र या जखमी जिवांसाठी वरदान ठरले. गेल्या दहा वर्षात तब्बल साडेनऊ हजार प्राणी आणि पक्षी या केंद्रात उपचारासाठी आले. त्यातील जवळपास पावणे सात हजार जीवांवर यशस्वी उपचार करुन त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
जखमी वन्यजीवांवर उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्याच्या उद्देशाने डिसेंबर २०१५ मध्ये सुरू झालेल्या ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात गेल्या दहा वर्षात वन्यजीवांसाठी उपचाराची अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात आली. रस्ते अपघातादरम्यान सापडलेले कोल्ह्याचे पिल्लू या केंद्रात आले तेव्हा त्याचे डोळे उघडायचे होते. मात्र, त्यावर उपचारच नाही तर मायेची ऊब देत मोठा झालेल्या त्या पिल्लाला जंगलात सोडण्यात आले. ‘ब्लॅक ईगल’ म्हणजेच काळा गरुड या पक्ष्याचे पंख कापले गेले. पंखांना जोडणाऱ्या सांध्यात बारिक रॉड टाकून त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
‘बर्ड एव्हिअरी’त त्याचा उडण्याचा सराव झाला आणि आता तोही निसर्गात मुक्त झाला. मागचे दोन पाय उचलू न शकणारा बिबट आता भौतिकोपचारामुळे बऱ्यापैकी पाय उचलायला लागला आहे. तो देखील काही दिवसातच चालायला लागेल. तर यापूर्वी देखील अर्धांगवायू झालेल्या बिबट्याला भौतिकोपचारामुळे जीवदान मिळाले. कोकणात आढळणारा ‘ब्राम्हणी काईट’ हा पक्षी नांदेडमध्ये जखमी अवस्थेत आढळला. तब्बल चारशे किलोमीटरचे अंतर पार करुन या पक्ष्याला उपचारासाठी केंद्रात आणले. तर अलीकडेच मध्यप्रदेशातून आजारी असलेला एक छोटासा पक्षी एका युवकाने केंद्रात उपचारसाठी आणला. त्यामुळे स्थानिक, राज्यातील आणि बाहेरच्या राज्यातील वन्यजीवांसाठी देखील हे केंद्र नवीन आशास्थान ठरले. केंद्राचे पशुवैद्यक अधिकारी तसेच त्यांचे सहाय्यक आणि उपचारादरम्यान व त्यानंतर त्यांची काळजी घेणारा कर्मचारी यामुळेच उपचारानंतर वन्यजीव बरे हाेऊन निसर्गात मुक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. वन्यजीवप्रेमी, सर्पमित्रच नाही तर नागरिकदेखील केंद्राशी जुळले आहेत. मुख्य म्हणजे त्यांच्यात वन्यजीवांविषयी जनजागृती झाली.
क्ष-किरण तपासणी, अस्थिरोगविषयक उपचाराची सुविधा, सोनोग्राफी, रक्ततपासणी, इन्क्युबेटर, गरजेनुसार खालीवर होणारा शस्त्रक्रियेचा टेबल यासह शस्त्रक्रिया करताना त्याची पडद्यावर तपासणी अशा अनेक सुविधा या केंद्रात आहेत. त्यामुळेच वन्यजीवांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. इनक्युबेटरसारख्या सुविधेमुळे सर्पमित्रांनी आणून दिलेली अंडी त्यात उबवली गेली आणि त्यातून बाहेर आलेल्या ११ पिलांना निसर्गमुक्त करण्यात आले. अशक्त असलेल्या पक्ष्यांच्या पिलांना त्यातून जीवदान मिळाले.