नागपूर : राज्याच्या उपराजधानीने गुरुवारी ८.३ अंश सेल्सिअससह विदर्भातील सर्वात थंड शहराची नोंद केली. तर गोंदिया आणि बुलढाणा ही शहरे ८.८ अंश सेल्सिअससह दुसऱ्या क्रमांकावर होते. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने विदर्भासाठी पिवळा इशारा दिला आहे.

नागपूरसह विदर्भातील सर्वच शहरात तापमानात लक्षणीय घट झाली असून सहा अंश सेल्सिअसने किमान तापमान घसरले आहे.

उत्तर भारतात सुरू असलेल्या हिमवर्षांवामुळे गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात थंडीची तीव्र लाट आहे. लाटेचा सर्वाधिक परिणाम नागपूर, गोंदिया आणि बुलढाणा शहरांत जाणवत आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यातही तापमान तीन ते सहा अंशाने कमी होत आहे.

थंडीच्या लाटेने अवघा महाराष्ट्र कवेत घेतला आहे. कधी नाही ते मुंबईकरांना देखील ऊबदार कपडय़ांची गरज भासू लागली आहे.

प्रचंड गारठा आणि असह्य बोचऱ्या वाऱ्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून नागपूरकर हैराण झाले आहेत. दिवसभर ऊबदार कपडे अंगावर असूनही थंडी कमी होत नाही. शेकोटय़ांनाही न जुमानणाऱ्या या थंडीमुळे आभाळाचे छत पांघरून रस्त्यावर निवारा शोधणाऱ्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार सध्यातरी थंडीच्या कडाक्यापासून सुटका नाही.

      शहर            तापमान

                 (अंश सेल्सिअस)

नागपूर              ८.३

गोंदिया               ८.८

बुलढाणा             ८.८

अकोला              ९.३

वर्धा                   ९.४

ब्रम्हपुरी              ९.८

अमरावती            १०

यवतमाळ            १०

गडचिरोली           ११

चंद्रपूर              ११.४

वाशीम               १२