रामटेक पोलिस ठाण्याअंतर्गत खैरी-बिजेवाडा ग्रामपंचायत क्षेत्रात मैदानाजवळच्या खड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्या मुलांना प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. उत्कर्ष लोकेश लांजेवार (७) आणि रिधान संजय सहारे (७) अशी या दोन चिमुकल्या मुलांची नावे आहेत.

शेतमजुरी करून उदर निर्वाह करणारे लोकेश लांजेवार आणि संजय सहारे हे दोघेही शेजारी शेजारीच राहतात. त्यांची मुले उत्कर्ष आणि रिधान एकाच वयाची आहेत. ते दोघेही एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होती. शनिवारी दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर ती घराशेजारच्या मैदानात खेळायला गेली. खेळता खेळता ती पाण्याने तुडुंब भरलेल्या खड्याकडे गेली.

खेळण्या बागडण्याचे, मस्ती करण्याचे अल्लड वय असल्याने दोघांनीही आपल्या चपला मैदानालगत पाण्याने तुडुंब भरलेल्या खड्ड्यात टाकल्या. त्या पाठोपाठ पाण्यात खेळण्यासाठी ही चिमुकली मुले खड्यात उतरली. मात्र पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्याच्या खोलीचा अंदाज त्यांना आला नाही. यात दोन्ही मुले पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. मात्र त्यावेळी मैदानाजवळ कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दुपारी बराच वेळापासून खेळायला गेलेली मुले घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र सायंकाळी ७.३०च्या सुमारास दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगता आढळले. रामटेक पोलिसांना तडक माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह शवविच्छेदनासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

पावसाने वाढविले संकट

सध्या संपूर्ण जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे तलावांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. सध्या सुरू असलेला पाऊस एकीकडे शेतीसाठी दिलासा देणारा असला तरी पावसामुळे जागोजागी साचत असलेल्या पाण्यामुळे अपघातांच्या घटना वाढण्याची जोखीमही वाढत आहे. ग्रामीण भागातील नदी नालेही पावसामुळ दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे शाळा, मैदान आणि रस्त्यांलगतच्या खड्यात साचत असलेले पावसाचे पाणी धोकादायक ठरत आहे.