नागपूर : प्रदेश युवक काँग्रेसमध्ये अंतर्गंत गटबाजी उफाळून आली आहे. प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या कार्यपद्धतीवर उघड टीका करणाऱ्या चार पदाधिकाऱ्यांना संघटनेतून निष्कासित करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युवक प्रदेश काँग्रेसने उपाध्यक्ष तनवीर अहमद, सरचिटणीस अनुराग भोयर, सचिव अक्षय हेटे आणि नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष मिथिलेश कन्हेरे यांना बुधवारी तात्काळ प्रभावाने कायमस्वरूपी निष्कासित करण्यात आले आहे. या चौघांवर पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या चौघांनी उघडपणे कुणाल राऊत यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. तसेच राऊत यांची संघटनेतील वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली होती.

सरसंघाचलक मोहन भागवत यांच्या वक्तव्याच्या विरोधातील आंदोलनात सहभागी न झाल्याने प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी तडकाफडकी ६० पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त केले होते. त्यापैकी आता चार जणांविरुद्ध निष्कासनाची कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे वरील कारवाई करताना नेते पुत्र केतन ठाकरे आणि शिवानी वडेट्टीवार यांना वगळण्यात आले. युवक काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अजय चिकारा यांनी हा आदेश काढला आहे.

६० पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आल्यानंतर युवक काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. प्रदेशाध्यक्षांवरही टीका झाली होती. श्रेष्ठींनी याची दखल घेत प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्त करण्यात आली होती. मोरे यांची नियुक्ती राऊत यांना धक्का मानली जाते. आता चार पदाधिकाऱ्यांना निष्कासित करून पुन्हा धक्का दिला आहे.

निष्कासित पदाधिकाऱ्यांकडून राऊत लक्ष्य

दरम्यान, निष्कासित पदाधिकाऱ्यांनी पुन्हा कुणाल राऊत यांच्यावर तोफ डागली आहे. देशभर संविधान सभा घेऊन भारतीय जनता पक्षाविरुद्ध रान उठविणाऱ्या राहुल गांधींच्या विचारांना छेद देण्याचे काम महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत व युवक काँग्रेसचे प्रभारी करीत आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रदेश युवक काँग्रेसचे निष्क्रिय अध्यक्ष म्हणून टेंभा मिरवणाऱ्या राऊत यांना पक्ष संघटनेची कार्य प्रणाली तरी माहीत आहे का ? असा प्रश्न या निमित्ताने पडतो.

कोणत्याही पदाधिकाऱ्याला पक्षातून कायमस्वरुपी निष्कासित करण्याची एक प्रणाली आहे, ज्याचा अधिकार केवळ राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष यांनाच असतो, हे देखील अध्यक्ष कुणाल राऊत यांना नाही.

महाराष्ट्र युवक काँग्रेसचा हुकूमशहा असलेला अध्यक्ष मनमानी पद्धतीने कारभार करत असताना भारतीय युवक काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मात्र यावर मुग गिळून आहे. ना कारणे दाखवा नोटीस, ना कुठली बैठक, अखेरच्या घटका मोजत बसलेले राऊत पदाधिकाऱ्यांना थेट पक्षातूनच हाकलत आहेत, अशी टीका एका प्रसिद्धी पत्रकातून निष्कासित पदाधिकाऱ्यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur what is going on in youth congress four more officials expelled rbt 74 ssb