नागपूर : ‘स्मार्ट मीटर’विरोधात राज्यभर आंदोलन तीव्र होऊ लागले आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकाही दाखल झाली आहे. जबरदस्तीने हे मीटर लावणे किंवा माहिती न देता मीटर लावलेल्यांकडून विविध ग्राहक संघटना एक प्रतिज्ञापत्र गोळा करून ते उच्च न्यायालयात सादर करणार आहे. यासोबतच संघटनांकडून रस्त्यावरही लढा तीव्र करण्याचे नियोजन होत आहे.

राज्यातील अनेक ग्राहकांकडून महावितरणकडे ‘स्मार्ट मीटर’ला आमचा विरोध असून ते लावू नये असे अर्जही संबंधित महावितरण कंपनीकडे दिले गेले आहे. त्यानंतरही राज्यात कंत्राटदार कंपनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हे मीटर लावत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या मीटरविरोधात विदर्भ वीज ग्राहक संघटनेकडून एक जनहित जाचिका दाखल केली गेली. त्यात न्यायालयाने सूचना दिल्यावरही केंद्रीय ऊर्जा विभागाकडून अद्याप त्यांचे उत्तर न्यायालयात सादर केले गेले नाही. ते पुढील सुनावणीत येणार काय, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे ग्राहक संघटनेकडून राज्यातील सगळ्याच जिल्ह्यात हे मीटर जबरदस्तीने लावले अथवा सूचना न देता बदलवले गेलेल्या ग्राहकांकडून नोटरीद्वारे प्रमाणित केलेले प्रतिज्ञापत्र गोळा करण्याची मोहीम सुरू केली गेली आहे. हे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे. सोबत हे मीटर लावायचे नाही, त्याबाबतचेही अर्ज गोळा करून न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे विदर्भ वीज ग्राहक संघटनेचे प्रशांत दर्यापूरकर यांनी सांगितले.

विदर्भ वीज ग्राहक संघटनेचे म्हणने काय ?

जबरदस्ती किंवा सूचना न देता मीटर बदललेल्या पाच वीज ग्राहकांचे नोटरीकडून प्रमाणित प्रतिज्ञापत्र उपलब्ध झाले असून ही संख्या लवकरच वाढलेली दिसेल. आमचा या मीटरला विरोध असून ते आमच्याकडे लावू नका असे सुमारे २५० अर्ज आमच्याकडे आले आहे. ते जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात सादर केले जातील, अशी माहिती लोकसत्ताशी बोलतांना विदर्भ वीज ग्राहक संघटनेचे प्रशांत दर्यापूरकर यांनी दिली.

जनहित याचिकेसाठी निधी गोळा करण्याची मोहिम…

विदर्भ वीज ग्राहक संखटनेसह इतरही संघनटेकडून स्मार्ट मीटरविरोधात जनहित याचिकासह रस्त्यावरील लढा लढण्यासाठी निधी गोळा करण्याची मोहिम राबवली जात आहे. त्यासाठी ग्राहकांनी मदत करण्याचे आवाहनही संघटनेकडून समाज माध्यमांसह प्रत्यक्ष भेटीद्वारे केले जात आहे. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेकडूनही या मोहिमेला सहकार्य केले जात आहे. त्यामुळे या मोहिमेचे पुढे काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.