गडचिरोली : वरिष्ठ माजी नक्षल नेता मल्लोझुला वेणुगोपालराव उर्फ सोनू उर्फ भूपती आणि टक्कलापल्ली वासुदेव राव उर्फ सतीश उर्फ रुपेश यांच्यासह आठवडाभरात तब्बल २७० सशस्त्र नक्षलवाद्यांनी गडचिरोली आणि छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण केले. नक्षलवादी चळवळीला हादरा देणाऱ्या या अभूतपूर्व घटनेनंतर पहिल्यांदाच नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने चारपानी पत्रक जारी करून सोनू व सतीशला धडा शिकविण्याचे आवाहन केले आहे.
तेलगू भाषेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्रकात, भूपती आणि सतीश देशद्रोही असल्याचे म्हटले आहे. जानेवारी महिन्यात भूपतीची पत्नी तारक्का हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासूनच भूपती मुख्यमंत्री आणि पोलिसांच्या संपर्कात होता,असा दावा पत्रकात करण्यात आला आहे.
डिसेंबर २०२० रोजी झालेल्या केंद्रीय समितीच्या बैठकीत भूपतीने चळवळीतील उणीवांवर बोट ठेवणारे दस्तऐवज सादर केले होते. ज्यात संघटनेच्या राजकीय आणि क्रांतिकारी भूमिकेवरच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. परंतु केंद्रीय समितीने भूपतीचा दावा फेटाळून लावला होता. यावेळी त्याला चुकीची राजकीय भूमिका, व्यक्तिवाद, अहंकार आणि हुकूमशाही प्रवृत्ती सोडण्याचा सल्ला देण्यात आला होता.
मात्र, यात तो अपयशी ठरला आणि संघटनेतील इतर सदस्यांची त्याने स्वार्थासाठी दिशाभूल केली. त्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने आत्मसमर्पण घडविण्यात आले. हा संघटना आणि जनतेशी केलेला विश्वासघात असून या दोघांनाही धडा शिकवा असे आव्हान करण्यात आले आहे. हे पत्रक अभय या नावाने प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पुन्हा उभारी घेऊ
संघटनेचा महासचिव बसवराजू आणि केंद्रीय समिती सदस्यांच्या मृत्यूनंतर चळवळीतील सदस्य दररोज मृत्यूचा सामना करत आले आहे. हीच बाब हेरून भूपतीने त्यांची दिशाभूल केली. मरणाला घाबरून कुणी शरण जात असेल तर जावे पण संघटनेचे शस्त्र सरकारकडे पूर्ण करू नये, असे समितीचे म्हणणे आहे. संघटनेच्या काही नेत्यांनी आणि सदस्यांनी शरणागती पत्करली असली तरी पक्ष कधीही शरण जाणार नाही, असा दावा करतानाच, हे धक्के तात्पुरते असून पक्ष त्यातून धडा शिकून पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास अभय याने व्यक्त केला आहे. तसेच, भूपती आणि सतीशसोबत गेलेल्या इतर कार्यकर्त्यांनी पुनर्विचार करून पक्षात परत यावे, त्यांना पक्षाकडून कोणताही धोका नसेल, असे आवाहनही करण्यात आले आहे. तूर्त, या सर्वांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.