गडचिरोली : माओवादी संघटनेने सरकारविरोधात नवी रणनीती आखली असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पत्रकाच्या माध्यमातून केले आहे. यात दीर्घकालीन युद्ध पुकारण्याचादेखील इशारा दिला आहे. माओवादी संघटनेच्या १९ वा वर्धापनदिनानिमित्त केंद्रीय समितीने २८ पानांचे पत्रक काढले, यात भाजपला इशारा देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माओवादी संघटनेचा १९ वा वर्धापन दिन सप्टेंबरमध्ये आहे. यानिमित्ताने २१ ते २७ सप्टेंबर २०२३ दरम्यान क्रांतीकारी उत्साहात हा सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केंद्रीय समितीने केले आहे. मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, ओडिसा, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाणा व मिझोराम या राज्यांतील विधानसभा तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत ब्राम्हणीय हिंदुत्वाविरुद्ध व्यापक लढा देण्याचे आवाहन माओवादी संघटनेने केले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे आवाहनदेखील पत्रकात केले आहे. देशातील खोट्या संसदीय जनवादाला नवजनवादाच्या माध्यमातून उत्तर देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी दीर्घकालीन लोकयुद्धासाठी जनतेला राजकीयदृष्ट्या तयार रहावे लागेल, असे पत्रकात नमूद आहे.

हेही वाचा – ‘सीव्हीएसटी’ दुर्मिळ आजार! गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, दीड महिने व्हेंटिलेटरवर, मुलाचे काय झाले पहा..

माओवादी संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त १२ कलमी कार्यक्रम निश्चित केला आहे. यात दंडकारण्याचा विकास, जनाधार आणि माओवादी संघटनेची बांधणी, वर्ग संघर्ष, दीर्घकालीन युद्धाला व्यापक करणे, साम्राज्यवादी, नोकरशाही व भांडवलशाहांविरोधात तीव्र लढा देणे अशी रणनीती आखली आहे.

हेही वाचा – लाडक्या बाप्पाचे आगमन १८ की १९ सप्टेंबरला, जाणून घ्या…

वर्षभरात १२१ नक्षली नेत्यांचा मृत्यू

माओवादी चळवळीने गतवर्षी १२१ नेते गमावल्याचा या पत्रकात उल्लेख आहे. यात ९० पुरुष तर, ३१ महिला नक्षल्यांचा समावेश आहे. केंद्रीय कमिटी सदस्य कटकम सुदर्शन उर्फ आनंद, राज्य कमिटी सदस्य एल.एस.एन.मूर्ती, बिहार, झारखड स्पेशल एरिया कमिटी सदस्य गौतम पाशवान या आघाडीच्या नेत्यांचा यात समावेश आहे. या सर्वांचे स्मरण करून ही चळवळ अधिक पुढे नेण्याचे आवाहन केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naxalites press campaign in the wake of 19th anniversary ssp 89 ssb