नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मागील आठवड्यात एका विशेष कामासाठी परदेशात पाठविले होते. गडकरी आता ‘त्या’ देशातून भारतात परत आले आहेत, मात्र मोदींनी तात्काळ पाठविल्याने गडकरींचे मागील आठवड्यातील अनेक नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले. गडकरी शनिवारी रात्री उशीरा भारतात परतले. विशेष बाब म्हणजे, जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: त्या देशात जाणार आहेत. साधारणत: गडकरी यांच्या प्रत्येक दौऱ्याची तसेच प्रत्येक कार्यक्रमाची समाजमाध्यमांच्या माध्यमातून माहिती दिली जाते. मात्र गडकरी यांच्या दौऱ्याचा फार गाजावाजा केला गेला नाही.
कुठे गेले होते गडकरी?
नितीन गडकरी हे भारतीय राजकारणातील एक प्रभावशाली आणि विश्वासार्ह नेतृत्व मानले जातात. रस्ते, महामार्ग, द्रुतगती मार्ग, पुल यांसारख्या पायाभूत सुविधांच्या झपाट्याने झालेल्या विकासामागे त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून अतिशय कार्यक्षमतेने काम करत “काम करणारा मंत्री” म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवोपक्रमशील विचारांमुळे त्यांनी पर्यावरणपूरक उपाय, सौर ऊर्जा, जैवइंधन आणि ग्रीन हायवे यांसारख्या योजनांना चालना दिली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी संघटनात्मक मजबुतीस हातभार लावला आहे. त्यांच्या स्वच्छ प्रतिमा, स्पष्टवक्ता स्वभाव, आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे त्यांना सर्वपक्षीय आदर लाभलेला आहे. त्यामुळे नितीन गडकरी हे आजच्या भारतीय राजकारणात एक प्रभावी, आधुनिक आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व मानले जाते. या सर्व कारणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गडकरी ब्राझीलमध्ये पाठविले होते.
ब्राझीलमध्ये ब्रिक्स संमेलनाचे अध्यक्षपद आहे. ६ आणि ७ जुलै रोजी ब्रिक्स संमेलनाचा मुख्य कार्यक्रम आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: सहभागी होणार आहे. मुख्य कार्यक्रमाच्या दोन महिन्यापूर्वी गडकरी यांना ब्राझीलमध्ये पाठविण्यात आले होते. गडकरी यांनी ब्राझीलमध्ये ब्रिक्स देशातील महत्वपूर्ण व्यक्तींशी संवाद साधला. यात ग्रीन हायड्रोजन, बायो फ्युल यासह आधुनिक इलेक्ट्रिक वाहनांबाबत चर्चा केली. गडकरी यांच्या दौऱ्यानंतर भारतातील वाहन क्षेत्रात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.
उल्लेखनीय आहे की, ब्रिक्स (BRICS) हा एक आंतरराष्ट्रीय गट आहे जो पाच उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या संधीतून तयार झाला आहे. या गटात ब्राझील (B), रशिया (R), भारत (I), चीन (C), आणि दक्षिण आफ्रिका (S) यांचा समावेश आहे. भारतासाठी ब्रिक्स हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे जिथे तो जागतिक प्रश्नांवर आपली भूमिका मांडू शकतो. तसेच, चीन आणि रशियासारख्या शक्तिशाली देशांबरोबर थेट संवादासाठी आणि सहकार्य वाढवण्यासाठी हे एक प्रभावी माध्यम आहे.