नागपूर : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत अल्पावधीत मेंदूज्वराचे (ॲक्युट एन्सेफॅलायटीस सिंड्रोम) २० रुग्ण आढळले. त्यापैकी ९ मुलांच्या मृत्यूंच्या कारणांचे गूढ कायम आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील (एनआयव्ही) तीन सदस्यीय पथकाने शहरातील एक मृत्यू झालेल्या मानकापूर भागातील प्राणी, डासासह इतरही काही नमुने गोळा केले. त्याची चाचणी एनआयव्ही प्रयोगशाळेत केल्यावर मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न होणार आहे.
शहरात मेंदूज्वराच्या वाढलेल्या मृत्यू संख्येमुळे आकस्मिक पोहचलेल्या ‘एनआयव्ही’च्या पथकामध्ये शास्त्रज्ञ डॉ. विजय बोंद्रे, डॉ. अविनाश देवशतवार, डॉ. सुरेंद्र कुमार यांचा समावेश आहे. तर त्यांच्यासोबत राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने राहुल जगताप, डॉ. प्रेमचंद कांबळे, डॉ. महेंद्र जगताप हेही नागपुरात आले आहेत. या सर्वांनी बुधवारी महापालिकेला भेट देत शहरातील मेडिकल, मेयो, एम्स या नावाजलेल्या राज्य व केंद्र सरकारच्या रुग्णालयालाही भेट दिली. येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तीव्र तापाच्या रुग्णांची माहिती घेत संशयित मेंदूज्वराच्या मृत्यू झालेल्या मुलांचे नमुने घेतले. तसेच संशयित रुग्ण राहणाऱ्या मानकापूर परिसरातील डास व प्राण्यांचे नमुनेही गोळा केले गेले.
या सर्व नमुन्यांची तपासणी पुण्याच्या ‘एनआयव्ही’ प्रयोगशाळेत केली जाणार आहे. महापालिकेच्या पहिल्या यादीत मेंदूज्वराचे २७ संशयित रुग्ण होते. परंतु, सूक्ष्म पाहणीत ७ संशयितांचा मेंदूज्वराशी संबंध निघाला नाही. त्यामुळे हे रुग्ण यादीतून वगळल्यावर महापालिकेला आणखी २० रुग्णांबाबत सूक्ष्म तपासणीची सूचना केली व २० मेंदूज्वर संशयितात नागपूर शहरातील दोन आणि नागपूर ग्रामीणचे २ अशा एकूण चार रुग्णांचा समावेश आहे.
त्यापैकी शहरात एक व ग्रामीणला एक अशा दोन संशयितांचा मृत्यू आहे. एकूण आढळलेल्या वीस रुग्णांपैकी आठ रुग्ण पूर्व विदर्भातील होते. तर इतर एक गडचिरोलीचा होता. इतर रुग्ण मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरातील होते. गडचिरोलीतीलही संशयित रुग्णाचाही मृत्यू झाला आहे, हे विशेष.
जपानी मेंदूज्वर की चंडिपुरा?
मेंदूज्वर संशयित रुग्ण आणि मुलांना असलेला मेंदूज्वराचा प्रकार हा जपानी मेंदूज्वर आहे काय? की या मुलांना चंडिपुरा आहे? त्या पद्धतीनेही तपासणी केली जात आहे. या माहितीवरही ‘एनआयव्ही’च्या चमूचे लक्ष आहे.
प्रतिजैविक औषधोपचाराचा सल्ला
सध्या थंडी वाजणे व तीव्र ताप येणारे रुग्ण वाढले असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले. त्यापैकी अनेक रुग्णांत तीव्र सर्दी, खोकलासह इतर लक्षणे आढळत आहे. या पद्धतीच्या रुग्णांना लक्षणानुसार प्रतिजैविक देण्याचा सल्ला पथकातील तज्ज्ञांकडून दिला गेल्याचे सूत्रांनी सांगितले.