अमरावती : जिल्ह्यात गेल्‍या आठ वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाला (एनटीसीपी) मोठे यश मिळाले असून, या कार्यक्रमामुळे तब्बल ५ हजार ७०० लोकांनी तंबाखूचे व्यसन सोडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा समन्वय समितीमार्फत हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल ८४६ शाळांमध्ये  १ लाख ४८ हजार ५५८ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून, जनजागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, तंबाखू सोडण्यास मदत करण्यासाठी जिल्हा रुग्णालय आणि तालुका स्तरावर एकूण १४ समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत, जिथे सन २०१७ पासून आजपावेतो  ९० हजार ३२८ लोकांना समुपदेशन करण्यात आले.

यासोबतच, ‘कोटपा’ कायदा २००३ ची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे . कोटपा कायदा म्हणजे सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीवर बंदी आणि व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि वितरणाचे नियमन) कायदा, २००३ होय. या कायद्याचा उद्देश तंबाखूच्या वापराला प्रतिबंध करणे आणि त्याच्या जाहिराती, व्यापार आणि उत्पादनाचे नियमन करणे आहे. सन २०१७ पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ३ हजार ६६४ लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून ५ लाख ८४ हजार ४१६ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अन्न व औषध विभागाने २०१८ पासून अवैध तंबाखूवर २१२ कारवाया करत ५ कोटी ५१ लाख रुपयांहून अधिक किमतीचा माल जप्त केला आहे. या यशासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य, पोलीस, शिक्षण व अन्न व औषध विभागाच्या समन्वयाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

कोणत्याही प्रकारे तंबाखू सेवन केल्याने कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. कर्करोगाला आमंत्रण देणारी रसायने तंबाखूमध्ये आढळतात. त्यामुळे तंबाखू आणि तंबाखूचे धूम्रपान शरीराला प्रचंड घातक आहे. शिवाय धूम्रपान करणाऱ्याच्या किंवा तंबाखूच्या धुराच्या जास्त संपर्कात राहिल्यास श्वसन आणि फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि पान तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांवर कारवाई होते; मात्र, धूम्रपान किंवा तंबाखू खाण्याची सवय सोडता येते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून रुग्णावर समुपदेशन आणि उपचार करण्याची सोय उपलब्ध आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन सातत्याने वाढते आहे. या पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे कर्करोगाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.