यवतमाळ : ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रश्‍नावर राज्यभर आंदोलन पेटले असताना वणी तालुक्यातील कायर गावातील एका युवकाने या मुद्द्यावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अजय पुंडलिक शेंडे (३२, रा. कायर) असे मृताचे नाव आहे.

वणी तालुक्यातील घुग्गुस रोड टोल प्लाझा जवळील शिव मंदिराच्या मागे सोमवारी त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. मृताच्या खिशात विषारी द्रव्य विकत घेतल्याच्या देयकावर मागील बाजूस, ‘मी अजय शेंडे, रा. कायर ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण दिल्याने मी आत्महत्या करत आहे,’ हा संदेश लिहिलेली चिठ्ठी आढळली. त्यामुळे अजयने मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून आत्महत्या केल्याची वार्ता सर्वत्र पसरली आणि खळबळ उडाली.

अजय हा १८ सप्टेंबरपासून घरातून बेपत्ता होता. याबाबत शिरपूर पोलीस ठाण्यात ‘मिसिंग’ची तक्रारही नोंदविण्यात आली होती. सोमवारी पोलीसांना एक निनावी फोन आला. त्यात, घुग्गुस मार्गावर शिव मंदिराच्या मागे एका इसमाचा मृतदेह पडला आहे, अशी माहिती मिळाली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश अपसुंदे, उपनिरीक्षक सुदाम आसोरे, अमलदार राजू देठे, पो.का. ज्ञानेश्वर सोनटक्के व चालक अविनाश देवकर घटनास्थळी दाखल झाले.

तेथे अंदाजे ३२ वर्षीय पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. तपासादरम्यान मृताच्या पँटच्या खिशात मोबाईल सापडला. त्यावरून मृतदेहाची ओळख पटली. अजय हा विवाहित असून, गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून त्यातील मजकुराने खळबळ उडाली आहे. मात्र, अजय नेमका बेपत्ता का झाला, मागील १० दिवस तो कुठे होता, त्याचा मृत्यू आत्महत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप पोलिसांकडून स्पष्टता आलेली नाही.

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अंतिम निष्कर्ष निघणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृताजवळ आढळलेल्या चिठ्ठीबाबत चौकशी सुरू असून, चौकशीनंतरच ही ‘सुसाइड नोट’ खरी की खोटी याबाबत निष्कर्ष निघेल, अशी माहिती ठाणेदार उंबरकर यांनी दिली. या घटनेमुळे कायर परिसरात तसेच मराठा-ओबीसी आरक्षण वादाच्या संदर्भात मोठी खळबळ उडाली आहे. आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर युवकाने टोकाचे पाऊल उचलल्याने सामाजिक वर्तुळात गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.