नागपूर : सर्वत्र धुळवळीचा सण साजरा होत असताना शहरात विचित्र रस्ते अपघातात एक जण ठार झाला तर चौघे जण जखमी झाले. हा अपघात सोमलवाड्यात झाला असून भरधाव कारने विजेच्या खांबावर धडक दिल्यानंतर एका दुचाकीस्वाराला धडक दिली. या विचित्र अपघातात कारमधील एक जण ठार तर अन्य चार जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री अकरा वाजता सोमलवाड्यात घडला. ऋषिकेश रमेश नितनवरे (२६, मिलिंदनगर, खामला) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अन्य गंभीर जखमी तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुक्रवारी रात्री अकरा वाजता  वर्धा मार्गावरुन एक भरधाव कार जात होती. कारमध्ये ऋषिकेश नितनवरे, कुणाल, सुशांत आणि रोहित सीतापुरे हे बसले होते. सोमवाडा चौकात आल्यानंतर  रोहितचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर धडकली. त्यानंतर कारने समोरुन येणाऱ्या पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला धडक दिली. या विचित्र अपघातात कारमधील तीन युवक रोहित, कुणाल, ऋषिकेश, सुशांत आणि दुचाकीस्वार शेखर दीपक शिरभाते (३३, स्नेहनगर) हे चौघेही गंभीर जखमी झाले.

अपघात होताच नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. सोनेगाव पोलिसांनी सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान ऋषिकेश नितनवरे याचा मृत्यू झाला. जखमींवर उपचार सुरु असून एका युवकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी जखमी युवक शेखर शिरभाते याचा मित्र चेतन दिग्रसकर (लाडीकर ले आऊट) याच्या तक्रारीवरुन आरोपी कारचालक रोहित सीतापुरेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कारच्या धडकेत पती-पत्नी गंभीर 

दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नीला एका भरधाव कारने धडक दिली. या अपघातात पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कार चालक पळून गेला. त्याचा पोलीस शोध घेत आहे. कोराडी पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात घडला. फिर्यादी रवींद्र शंकरराव कुळसुंगे (३८, रा. लुंबिनीनगर, जरीपटका) हे गुरूवारी दुपारी (एमएच ३१ बीजी ७६५६) क्रमांकाच्या दुचाकीने पत्नीसोबत कोराडी हद्दीत गायकवाड चौकातून जात होते. या दरम्यान, एका अज्ञात कारने कुळसुंगे यांच्या दुचाकीला धडक दिली आणि पळून गेला. अपघातात कुळसुंगे पती-पत्नी दोघेही वाहनासह खाली पडल्याने गंभीर जखमी झाले. दोघांनाही एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी फिर्यादी रवींद्र कुळसुंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी आरोपी चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One killed and four injured after speeding car hit a power pole then two wheeler in nagpur adk 83 zws