नागपूर: महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्ताने नागपुरातील कोराडी विद्युत विहार वसाहतीतील मुख्य रस्त्यावर ‘हॅप्पी स्ट्रीट’ आमचं गाव साकारण्यात आले. महानिर्मितीच्या राज्यभरातील अधिकारी-कर्मचारी व कुटुंबीयांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उन्हाळ्यात शाळेला सुट्ट्या लागल्या की मामाच्या गावाला जाऊन धमाल मस्ती करायची, गावाकडील निसर्गरम्य मातीशी नातं जोडीत, नात्यांची वीण अधिक घट्ट करायची अशी आपली मराठी संस्कृती असते. मात्र धकाधकीच्या जीवनात ही जागा टी.व्ही., मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या आभासी दुनियेने व्यापल्याने जीवनाचा खरा-खुरा आनंदच दूर झाला. मानवी जीवन तांत्रिक झाले, यातून उदयास आलेली शहरी संकल्पना म्हणजे ‘हॅप्पी स्ट्रीट’.

हेही वाचा – अकोला : थकबाकीचा डोंगर, वसुलीचे आव्हान; …तर गुन्हा दाखल होणार

महानिर्मितीने रविवारी सकाळी सुटीच्या दिवशी कोराडी वसाहतीतील मुख्य रस्त्यावरील रहदारी काही वेळापुरता बंद करून त्याठिकाणी मनसोक्त खेळ, धमाल मस्ती करण्याचा अनोखा उपक्रम राबविला. त्यात महानिर्मितीच्या राज्यभरातील अधिकारी-कर्मचारी व कुटुंबीयांनी सहभाग घेतला. उपस्थितांनी हिरव्यागार वृक्षांच्या सावलीत, रंगबिरंगी फुगे, झेंडे, तोरणे, कागदी फुलांनी रस्त्याला आकर्षक सजवले. सोबतीला मिकी माउस, चार्ली चॅपलीन आणि मोटू-पतलू कार्टुन्स उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. वयाचे भान विसरून, आपलं-परकं विसरून, प्रत्येकाने बालपणीच्या खेळाचा निखळ आनंद लुटला.

नेहमी चारचाकी चालविणारा बैलबंडी चालवित होता तर माता-भगिनी आपल्या मुलांना विसरून टिक्कर बिल्ला, लगोरी, दोरीवरच्या उड्या, पाळणे इत्यादींचा मनसोक्त आनंद घेत होत्या. यावेळी एरवी घरात बोलायला वेळ नसणारी पालक मंडळी ‘हॅप्पी स्ट्रीट’वर एकमेकांशी खुलून बोलताना दिसली, तर मुले-मुलीदेखील आपले आई-वडील, टायर, लोखंडी रिंग चालवित धावत असल्याचे पाहून आश्चर्य चकित झाले. अनेकांनी गाणे म्हणून आपले गळे साफ केले. याप्रसंगी उपस्थितांनी विविध खेळांचाही आनंद लुटला.

हेही वाचा – नागपूर : पळून जाऊन लग्न करण्यासाठी दबाव, प्रियकराविरुद्ध प्रेयसीची पोलिसात तक्रार; बलात्काराचा गुन्हा दाखल

कार्यक्रमाला महानिर्मितीचे संचालक (संचलन) संजय मारुडकर, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, मुख्य अभियंते विलास मोटघरे, अनिल काठोये, विवेक रोकडे, सुनील रामटेके, कोराडी-खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे उप मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते,  वर्धापन दिन समितीचे सचिव राजेश गोरले, सहसचिव सचिन डांगोरे, महावितरण चे उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, सेवानिवृत्त अधिकारी संजय अस्वले, विभागप्रमुख, अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Our village made by electricity workers what is happy street mnb 82 ssb