गडचिरोली : राज्यभरात गाजत असलेल्या धान खरेदी आणि भरडाई घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही अद्याप बहुतांश आरोपी मोकाट असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. गोठणगाव धान खरेदी केंद्रात चार कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर कुरखेडा आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक एम. एस. बावणे यांच्यासह कर्मचारी व संस्थेच्या पदाधिकारी असे एकूण १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोबतच निकृष्ट तांदूळ पुरवठा करणाऱ्या चार गिरणीमालकांवरही गुन्हा दाखल झाला आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालय अंतर्गत येत असलेल्या देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेद्वारे केलेल्या धान खरेदीत २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये मिळून तब्बल दहा हजार क्विंटलची तफावत आढळली होती. बारदान्यामध्येही अफरातफर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. दोन्ही वर्षांत एकूण ३ कोटी ९५ लाख रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला.
याप्रकरणी कुरखेडाचे प्रादेशिक उपव्यवस्थापक बावणे, विपणन अधिकारी सी. डी.कासारकर, एच.व्ही. पेंदाम व संबंधित अध्यक्ष, सचिव, संचालक असे एकूण १७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. मात्र, कारवाईची कुणकुण लागताच सर्व आरोपी फरार झाले आहे. त्यातील विपणन अधिकारी सी. डी.कासारकर, एच.व्ही. पेंदाम यांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर अद्याप फरार आहेत.
गिरणीमालक फरार
आरमोरी येथील जनता राईस मिलला २०२१-२२ मध्ये ९ हजार ३१६ क्विंटल धान भरडाईसाठी दिले होते. त्यापासून त्यांनी ६ हजार २४३ क्विंटल तांदूळ तयार करून शासनाला पुरवला. त्यापैकी एका लॉटमधील ४०५ क्विंटल धानापासून २७० क्विंटल तांदूळ तयार केला. मात्र, प्रत्यक्षात शासकीय गोदामात काळ्या बाजारातील निकृष्ट दर्जाचा तांदूळ (बीआरएल) पुरवठा केला. यातून ७ लाख ८५ हजार ७०० रुपयांची फसवणूक केली, असा ठपका ठेऊन गिरणीमालक हैदर पंजवानी यांच्याविरुद्ध २ मे रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. ३ मे रोजी देसाईगंजातील अजय राईस मिलचे मालक भास्कर किसन डांगे यांच्यावर गुन्हा नोंद झाला. त्यांच्यावरही ७ लाख ८५ हजार ७०० रुपयांच्या धानाचा काळाबाजार केल्याचा आरोप आहे.
केंद्रीय पथकाने केलेल्या तपासणीत तांदूळ निकृष्ट आढळला. त्यानंतर तपासणी केली असता ४०५ क्विंटल धानापासून तयार करून गोदामात पाठविलेला २७० क्विंटल तांदूळ खाण्यास अयोग्य असल्याचे समोर आले. तिसऱ्या प्रकरणात सोनल पोहा उद्योग मिल, देसाईगंजच्या मालक माया प्रभाकर डांगे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. राईस मिल बंद असताना, विद्युत जोडणी नसताना धान भरडाई केल्याचे दाखवून काळ्या बाजारातील तांदूळ पुरवठा केल्याचा ठपका ठेवला आहे. एकूण १ लाख ८२ हजार ७४३ रुपयांच्या फसवणुकीचा त्यांच्यावर आरोप आहे. चौथ्या प्रकरणात शारदा स्टिम प्रोडक्ट, कुरूड या संस्थेचे मालक राजकुमार अर्जुनदास मोटवाणी यांच्यावर गुन्हा नोंद झाला. १५ एप्रिल २०१९ रोजी यशवंत नाकतोडे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठीत केली. यात शारदा स्टिम प्रोडक्ट ही गिरणी बंद आढळली, तरीही ३ हजार ७५१ क्विंटल धान भरडाई केल्याचे दाखवून फसवणूक केल्याचा ठपका ठेवला आहे. यातून अंदाजे ७० लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा संशय आहे.