डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप; मृत्यू प्रमाणपत्रावर चुकीची तारीख

सोमवारपेठेतील राज्य कामगार विमा रुग्णालयात मंगळवारी हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी शस्त्रक्रियागृहात चालत गेलेल्या रुग्णाची प्रकृती अचानक खालावली. त्याला तेथील डॉक्टरांनी रामदासपेठेतील एका खासगी रुग्णालयात हलवले. येथे रुग्णाचा मृत्यू झाला. विमा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणानेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यातच रुग्णाच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही २०१६ ची तारीख टाकण्यात आली होती.

दीपक ब्राम्हणकर असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. दीपक हे संतोष केअरवेल्स सिक्युरेटी सव्‍‌र्हिसेस या कंपनीत सुपरव्हायजर या पदावर होते. या कंपनीने त्यांची सेवा मिहानमधील लुपीन फार्मासिटीकल या कंपनीत लावली होती. त्यांना गेल्या काही दिवसांपासून हर्नियाचा त्रास होता. त्यांनी सोमवारपेठेतील विमा रुग्णालयात डॉक्टरांकडून उपचार सुरू केले. विविध वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना विमा रुग्णालयात १५ जानेवारीला शस्त्रक्रियेची तारीख देण्यात आली. त्या दिवशी ते पत्नीसह रुग्णालयात पोहोचले, परंतु डॉक्टरांनी रुग्णाकडे लक्षही दिले नाही. त्यानंतरही ते रुग्णालयात दाखल झाले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ९.३० वाजता रुग्णाला शस्त्रक्रिया गृहात शस्त्रक्रियेसाठी चलण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्ण स्वत:च्या पायावर तेथे चालत गेला, परंतु २० ते ३० मिनिटांनी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांकडून धावपळ सुरू झाली.

नातेवाईकांना शस्त्रक्रियेपूर्वीच रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्यांना रामदासपेठेतील एका रुग्णालयात हलवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानुसार रुग्णाला खासगी रुग्णालयात हलवल्यावर त्याच्या हृदयाचे ठोके बंद असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णाला वाचवण्यासाठी काही प्रयत्न करण्याची परवानगी घेत खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू झाले, परंतु रुग्णाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे बघत डॉक्टरांनी काही वेळाने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या रुग्णाचा विमा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणानेच मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. येथे विमा रुग्णालयातील डॉक्टरांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. दरम्यान, खासगी रुग्णालयाने रुग्णाच्या दिलेल्या मृत्यू प्रमाणपत्रावर चक्क २०१६ ची तारीख टाकली होती. त्यामुळे नातेवाईक जास्तच संतापले. पोलिसांच्या चौकशीनंतरच आता या रुग्णाच्या मृत्यूचे खरे कारण पुढे येणार आहे.

रुग्णाला शस्त्रक्रियागृहात नेल्यावर त्याला भुलीची लस टोचून त्यावर काही प्रक्रिया करण्यात आल्या. त्याची प्रकृती बिघडताच त्याला तातडीने डॉक्टर, परिचारिका सोबत देऊन रुग्णवाहिकेतून केयर रुग्णालयात हलवले. हा रुग्ण विमा रुग्णालयात दगावला नसून केयर रुग्णालयात दगावला आहे. या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी करण्यात येईल.

– डॉ. मीना देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, राज्य कामगार विमा रुग्णालय, नागपूर</strong>